जनसंघर्ष अर्बन निधीमध्ये ४४ कोटींचा अपहार करणाऱ्या मास्टरमाईंडला लोणावळ्यातून केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 12:45 IST2025-01-16T12:45:05+5:302025-01-16T12:45:38+5:30
Yavatmal : १० दिवसांची कोठडी

Mastermind who embezzled Rs 44 crores from Jansangharsh Urban Fund arrested from Lonavala
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस (यवतमाळ) : येथील बहुचर्चित जनसंघर्ष अर्बन निधीमध्ये ४४ कोटींचा अपहार करणाऱ्या मास्टरमाईंड प्रणीत मोरेसह त्याच्या कुटुंबाला बेड्या ठोकण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील आलिशान विलामधून चौघांना मंगळवार, १४ जानेवारीला रात्री १० वाजता ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पांढरकवडा एसडीपीओ, एलसीबी आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
प्रणीत मोरे, देवानंद मोरे, प्रीतम मोरे आणि जयश्री मोरे अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. ३ जानेवारीला साहिल जयस्वाल, अनिल जयस्वाल, पुष्पा जयस्वाल या तिघांना नागपूर येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. साहिलला दारव्हा न्यायालयाने १५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तर त्याच्या आईवडिलांना न्यायालयीन कोठडीत पाठविले. मुख्य आरोपी प्रणित मोरे व त्याचे कुटुंब मात्र पसारच होते. आरोपींना त्वरीत अटक करावी, अशी मागणी निधी सुरक्षा समितीने लावून धरली होती. अखेर पोलिसांनी तपासचक्रे फिरवत मोरे कुटुंबाचा शोध लावला.
१० दिवसांची कोठडी
पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील आलिशान विलातून अटक करून आज बुधवारी सकाळी दिग्रस पोलिस ठाण्यात आणले. दारव्हा न्यायालयाने प्रणित व प्रीतमला १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. महिलेची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली तर देवानंद मोरेला प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात रेफर केले आहे.
४४ कोटी बुडाले
जनसंघर्ष अर्बन निधीच्या दिग्रस, दारव्हा, नेर, पुसद, आर्णी, कारंजा आणि मानोरा शाखेतील सहा हजार २०० खातेदारांचे ४४ कोटी बुडवून संचालक मंडळ पसार झाले. दिग्रस पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हे नोंदविण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला.