मास्तर म्हणजे समाजाची माय
By Admin | Updated: February 1, 2016 02:18 IST2016-02-01T02:18:16+5:302016-02-01T02:18:16+5:30
लोकांच्या मनाची नाळ आपल्याला कळली पाहिजे. मास्तर म्हणजे समाजाची माय असतो. म्हणूनच शिकविण्यासोबतच शिक्षकांनी ...

मास्तर म्हणजे समाजाची माय
बाळकृष्ण सरकटे : राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचा समारोप
यवतमाळ : लोकांच्या मनाची नाळ आपल्याला कळली पाहिजे. मास्तर म्हणजे समाजाची माय असतो. म्हणूनच शिकविण्यासोबतच शिक्षकांनी समाजाच्या व खास करून शेतकऱ्यांचे सुख-दु:ख समजून घेतले पाहिजे. त्यांच्या आयुष्यात परिवर्तनासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन डॉ. बाळकृष्ण सरकटे यांनी केले.
जगद्गुरू तुकोबाराय साहित्यनगरीत (नेहरू स्टेडियम) आयोजित राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या समारोपीय सत्रात ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते. यावेळी शिक्षक साहित्य संघाचे संस्थापक अध्यक्ष जयदीप सोनखासकर, विनय मिरासे, जिल्हाध्यक्ष किशोर तळोकर, ताराचंद कंठाळे, अशोक राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. बाळकृष्ण सरकटे म्हणाले की, महात्मा फुले यांनी सामूहिक शेतीची कल्पना मांडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतीच्या राष्ट्रीयीकरणाची मागणी केली होती. डॉ. पंजाबराव देशमुख यांनीही शेतीसुधारणेसाठी खूप प्रयत्न केले. मात्र, या महापुरुषांच्या शेतीविषयक विचारांचा शासनाने विचार केला नाही. त्यामुळेच आज शेतीची अवस्था वाईट झाली आहे. विपन्नावस्थेतील शेतकऱ्यांविषयी आज समाजात विकृत पद्धतीने बोलले जात आहे. पोरीच्या लग्नात अनाठायी खर्च केला, दारू पिण्याचे व्यसन आहे, म्हणूनच शेतकरी हलाखीत पोहोचले आहे, असे बोलले जाते. मात्र, ते खरे नाही. समाजातील ही चुकीची मानसिकता निट करण्याचे काम आपल्यालाच करायचे आहे. कारण आपण शिक्षक समाजाची माय आहोत. जो दुसऱ्यासाठी जगतो, तो कधीच मरत नाही. अन् जो स्वत:पुरताच जगतो, तो मेलेलाच असतो.
शिक्षक साहित्य संघाचे अध्यक्ष जयदीप सोनखासकर म्हणाले की, शिक्षकांनी अधिकाऱ्यांच्या समोर-समोर फिरू नये. तर अधिकाऱ्यांनाच आपल्या मंचावर बोलवावे आणि आपले उत्तम काम पाहण्यासाठी त्यांना भाग पाडावे. आता सॅकद्वारे आपल्या शाळांचे मूल्यांकन होणार आहे. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांकडे उत्तम लक्ष पुरवून शाळा टिकविण्याचे आव्हानही आपल्याला पेलावे लागेल. पुढचे साहित्य संमेलनही विदर्भातच व्हावे. कारंजा, दर्यापूर, नागपूर येथून संमेलनासाठी प्रस्ताव आले आहेत. यापैकीच एका ठिकाणी पाचवे संमेलन होईल.
पुणे येथील हरीश बुटले यांनी लिहिलेल्या ‘पालक’ या पुस्तकाचे यवतमाळात प्रकाशन करण्यात आले. यावेळी संमेलनासाठी सहकार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात मिलिंद इंगळे, महादेव निमकर, बन्सी कोठेकर, सुरेश चिमणकर, मोहम्मदभाई नूर, स्वप्नील वानखडे, अशोक राऊत, ताराचंद कंठाळे, किशोर तळोकार, प्रा. नंदकिशोर इंगळे, वैशाली गावंडे, विनय मिरासे,
केतकर, वडतकर, मादेशवार,
कुंभारे या शिक्षक-शिक्षिकांचा समावेश होता. शिवाय संमेलनात राबणाऱ्या स्वयंसेवकांचाही सत्कार करण्यात आला.
दरम्यान, संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी कथाकथन कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांनी हजेरी लावली. खुल्या कविसंमेलनात विनय मिरासे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक कवींनी जवळपास तीन तास कवितांचा पाऊस पाडला. सुरेश गांजरे यांच्या सूत्रसंचालनाने रंगत वाढविली. (स्थानिक प्रतिनिधी)