Marriage suicide in Chandorenagar | चांदोरेनगरात विवाहितेची आत्महत्या
चांदोरेनगरात विवाहितेची आत्महत्या

ठळक मुद्देपतीसह दोघांना अटक : नातेवाईक धडकले शहर ठाण्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील चांदोरेनगरातील रेणुका गृहनिर्माण सोसायटीत विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. या प्रकरणी तिच्या पतीने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र या विवाहितेला तिचा पती व सासरच्या मंडळींनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार तिच्या भावाने केली. आरोपींच्या अटकेसाठी विवाहितेचे नातेवाईक शहर ठाण्यावर धडकले होते.
काजल विशाल काटकर (२६) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिचा ११ जुलै रोजी चांदोरेनगरातील विशाल ज्ञानेश्वर काटकर (३०) याच्याशी विवाह झाला होता. रविवारी पहिली दिवाळी आटोपून नेर येथून काजल सासरी आली होती. त्यानंतर आठ दिवसातच आत्महत्येचा प्रकार घडला. काजलला पती व सासरच्या मंडळींकडून त्रास होता. या त्रासाला कंटाळूनच तिने आत्महत्या केली असावी असा आरोप तिचा भाऊ जगदीश अरुण काळे रा. नेरनबाबपूर याने केला आहे. पती व सासरच्या मंडळींनी बहिणीचा खून केला अशी तक्रार घेऊन काळे कुटुंबीय शहर पोलीस ठाण्यावर धडकले. त्यांंनी आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. या तक्रारीवरून शहर पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध भादंवि ४९८ व ३०४ अ कलमान्वये गुन्हा दाखल केला. तसेच पतीसह दोघांना ताब्यात घेतले.
शहर ठाण्यात आलेल्या संतप्त काळे कुटुंबियांशी एसडीपीओ माधुरी बावीस्कर यांनी चर्चा केली. कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतरच काळे कुटुंबीय तेथून गावाकडे परतले.

पहिली दिवाळीच ठरली अखेरची
नेर येथील काळे कुटुंबियांनी खासगी सुरक्षा रक्षक असलेल्या विशालसोबत मुलीचा विवाह लावून दिला. सुरुवातीचे काही दिवस सर्व सुरळीत होते. लग्नाला जेमतेम चार महिने झाले. लग्नानंतरची पहिल्या दिवाळी साजरी करण्यासाठी काजल माहेरी नेर येथे गेली. तेव्हा सासरच्या मंडळींनी तिला रविवारी परत बोलाविले. तेथून तीन दिवसातच आत्महत्येसारखा प्रकार घडला. यात घातपाताचा संशयही काजलच्या भावाने व्यक्त केला आहे. पोलिसांना शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. काजलची पहिलीच दिवाळी अखेरची ठरल्याचे सांगत तिच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला.

Web Title: Marriage suicide in Chandorenagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.