ऑनलाईन पेपर करीता थांबली काहीकाळ मंगलाष्टके; मुहूर्तानंतर नवरी चढली बोहल्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2020 21:35 IST2020-12-27T21:35:02+5:302020-12-27T21:35:11+5:30
Marriage after online Exam : नवरीने आनंदाने आपल्या वर्गमैत्रिणी सोबत ऑनलाईन पेपर सोडवून नंतरच ती बोहल्यावर चढली आणी मंगलाष्टके होऊन विवाह पार पडला.

ऑनलाईन पेपर करीता थांबली काहीकाळ मंगलाष्टके; मुहूर्तानंतर नवरी चढली बोहल्यावर
यवतमाळ : ऑनलाईन पेपर सोडवूनच नवरी चढली बोहल्यावर. त्याकरिता लग्नाचा मुहूर्त टाळण्यात आला. ही घटना घडली आहे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे.
दिग्रस येथील येथील सारीका अरुण शिखरे हिचा शुभविवाह अमरावती येथील निलेश साबळे यांच्या सोबत ठरला होता. दोन्ही वर्हाडांसह पाहुणे मंडळी मंगलाष्टकासाठी सज्ज होती. अशात उपवर नवरीने नवरदेवाला निरोप पाठविला की बीएस्सी ऍग्रो सहकार विषयाचा २ ते २.४० पर्यंत ऑनलाईन पेपर आहे ते सोडवून आपण लग्न करू. नवरदेवाने त्यांच्या कडील मंडळीला ही माहिती दिली. आणी संपूर्ण विवाह मंडपात ही वार्ता वाऱ्या सारखी पसरली. दोन्ही कडच्या मंडळीसह उपस्थित पाहुणे मंडळीने 'आधी परीक्षा व नंतर लग्न' याला संमती दिली .
नवरीने आनंदाने आपल्या वर्गमैत्रिणी सोबत ऑनलाईन पेपर सोडवून नंतरच ती बोहल्यावर चढली आणी मंगलाष्टके होऊन विवाह पार पडला. ऑनलाईन पेपर करीता मंगलाष्टके थांबवून दोन्ही कडच्या वर्हाडासह पाहुणे मंडळीने शिक्षणाला प्राध्यान्य दिल्या बद्दल शिखरे व साबळे परिवाराचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे .