अनोखी सर्वपित्री अमावस्या; ११३ जिवंत माता-पित्यांना मुलानं स्वत: भरवला गोड घास
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 20:37 IST2020-09-17T20:36:07+5:302020-09-17T20:37:30+5:30
वृद्धाश्रमात आगळीवेगळी सर्वपित्री अमावास्या; १२८ दिवंगतांचेही मनःपूर्वक स्मरण

अनोखी सर्वपित्री अमावस्या; ११३ जिवंत माता-पित्यांना मुलानं स्वत: भरवला गोड घास
यवतमाळ : देवाघरी गेलेल्या आईवडिलांना जेऊ घालण्याचा 'सर्वपित्री अमावास्येचा सण गुरूवारी हजारो मुलांनी पारंपरिकपणे पार पाडला. पण मुलं असूनही वृद्धाश्रमात पोहोचलेल्या ११३ जिवंत मायबापांना एका मुलाने मनःपूर्वक गोड घास भरवून समाज व्यवस्थेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले.
खरे पितृऋण फेडणारा हा प्रकार आर्णी तालुक्यात संत दोला महाराज वृद्धाश्रमात घडला. २ ऑक्टोबर १९९१ रोजी उमरीपठार येथे स्थापन झालेल्या या आश्रमात आजघडीला ११३ 'आईवडील' राहत आहेत. वृद्धाश्रमाचे संस्थापक सचिव शेषराव डोंगरे हेही आता वृद्धत्वाकडे झुकत असले तरी ते या मातापित्यांचे मूल बनून सेवा करीत आहेत. गेल्या २९ वर्षात येथे प्रत्येक वृद्धाचे औषधपाणी ते स्वतः काळजीपूर्वक करतात. यादरम्यान दगावलेल्या १२८ वृद्धांचा अंत्यसंस्कारही त्यांनीच मुलाच्या कर्तव्यभावनेने केला. तर गुरूवारी त्यांनी या दिवंगत १२८ मातापित्यांसाठी 'घास' टाकण्याचा विशेष कार्यक्रम केला. मात्र केवळ दिवंगतांप्रती 'उपचार' पार पाडण्यापेक्षा जिवंत मायबापांनाही आनंद दिला पाहिजे याचे स्मरणही त्यांनी ठेवले. त्यासाठीच वृद्धाश्रमात गोडधोड जेवण तयार करून त्यांनी स्वतः वृद्धांना प्रेमपूर्वक जेऊ घातले. यावेळी वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक जयप्रकाश डोंगरे, राजू जैस्वाल यांनी व्यवस्था सांभाळली.
वृद्ध माता पित्यांची सेवा करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. पण आज कुटुंबांमध्ये वृद्धांकडे दुर्लक्ष होत आहे. म्हणून ते वृद्धश्रमाची वाट धरतात. मृत मातापित्यांची सेवा करण्यापेक्षा त्यांना जिवंतपणीच प्रेम दिले पाहिजे.
- शेषराव डोंगरे, संस्थापक सचिव, संत दोला महाराज वृद्धाश्रम, उमरीपठार, आर्णी