रात्री घरून जेवण करून गेले अन् सकाळी मृतदेहच आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2022 16:11 IST2022-05-09T16:09:28+5:302022-05-09T16:11:11+5:30

राजूची पत्नी बाहेर कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वयंपाकासाठी गेली होती. जेवण घेतल्यानंतर राजू नेहमीप्रमाणे फिरायला बाहेर गेला. रात्री घरी पोहोचलाच नाही.

man died by drowning in a well at mohada | रात्री घरून जेवण करून गेले अन् सकाळी मृतदेहच आढळला

रात्री घरून जेवण करून गेले अन् सकाळी मृतदेहच आढळला

मोहदा (यवतमाळ) : रात्री घरी जेवण करून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेहच विहिरीत आढळल्याचा प्रकार रविवारी मोहदा येथे उघडकीस आला. राजू मारोतराव बारी (५०, रा. मोहदा) असे मृताचे नाव आहे. समोसे विकून उपजीविका चालविणाऱ्या राजूच्या जाण्याने त्याचे कुटुंब उघड्यावर आले आहे. पत्नी, दोन मुली असा त्याचा परिवार आहे.

राजूची पत्नी बाहेर कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वयंपाकासाठी गेली होती. जेवण घेतल्यानंतर राजू नेहमीप्रमाणे फिरायला बाहेर गेला. रात्री घरी पोहोचलाच नाही. रविवारी सकाळी महिला येथील ले-आऊट भागातील विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. त्यांना या विहिरीत राजूचा मृतदेह तरंगताना आढळला.

विहिरीच्या काठावर बसल्याने तोल जाऊन राजू पडला असावा, असे घटनास्थळावरील परिस्थितीवरून दिसून येते. विहिरीत पडल्यानंतर त्याने मोटारपंपाचा पाईप पकडण्याचा प्रयत्न केला. पाईप तुटल्यामुळे वर येण्याचा आधारही संपला. त्यातच बुडून त्याचा मृत्यू झाला असावा, असे सांगितले जाते. या घटनेची माहिती पोलीस पाटील पीयूष गबरानी यांनी पांढरकवडा पोलिसांना दिली.

बीट जमादार प्रेमदास फुलके, गुणवंत मडावी, राजू रणमले घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून राजूचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पांढरकवडा येथे रवाना केला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: man died by drowning in a well at mohada