यवतमाळ शहरातील मुख्य रस्ते वाहनांसाठी की जनावरांसाठी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 21:35 IST2019-08-21T21:34:40+5:302019-08-21T21:35:41+5:30
मोकाट जनावरांमुळे यवतमाळचे रस्ते जाम झाले आहेत. कुठल्याही रस्त्यावर जा, तुम्हाला मोकाट जनावरे दिसतीलच. अशा स्थितीत वेगाने वाहन चालवले तर अपघात होणारच. याचा अनुभव वाहनचालकांना दररोज येत आहे. नगरपरिषद प्रशासन मात्र उपाययोजना करण्यासाठी तयार नाही.

यवतमाळ शहरातील मुख्य रस्ते वाहनांसाठी की जनावरांसाठी?
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मोकाट जनावरांमुळे यवतमाळचे रस्ते जाम झाले आहेत. कुठल्याही रस्त्यावर जा, तुम्हाला मोकाट जनावरे दिसतीलच. अशा स्थितीत वेगाने वाहन चालवले तर अपघात होणारच. याचा अनुभव वाहनचालकांना दररोज येत आहे. नगरपरिषद प्रशासन मात्र उपाययोजना करण्यासाठी तयार नाही.
नगरपरिषदेने शहरातून जाणारे महामार्ग स्वत:च्या ताब्यात घेतले. या मार्गाच्या देखरेखीची जबाबदारी नगरपरिषदेची आहे. तेथील मोकाट जनावरांना नियंत्रित करण्याचे कामही नगरपरिषद कर्मचाऱ्यांवर आहे. त्या दृष्टीने एका प्रभागासाठी दोन या प्रमाणात ५८ सफाई कर्मचाऱ्यांवर ही जबाबदारी टाकण्यात आली आहे. असे असले तरी कोणीच मोकाट जनावरांना नियंत्रित करीत नाही. आता तर या जनावरांना रस्त्यांच्या सौंदर्यीकरणामुळे रान मोकळे झाले आहे. रस्ता दुभाजकांवर आणि गार्डनमध्ये ही जनावरे मुक्तपणे संचार करत आहेत. या ठिकाणची हिरवळ फस्त करीत आहेत. यामुळे लाखोंचा खर्च व्यर्थ जाणार आहे.
ज्या कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे प्रशासनातील अधिकारीही अवाक्षर काढत नाही. त्यांच्या या बेजबाबदारपणामुळे सर्वसामान्य नागरिकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. वारंवार वाहतुकीचा खोळंबा होत आहे.
कोंडवाड्याचा लाखोंचा खर्च व्यर्थ
मोकाट जनावरांना शिस्त लावण्यासाठी कोंडवाड्याची निर्मिती झाली आहे. नगरपरिषदेच्या बजेटमध्ये त्याचे नियोजनही करण्यात येते. मात्र यानंतरही या कोंडवाड्यात वर्षभरात किती जनावरे जातात, हे कोडेच आहे.
वर्दळीच्या मार्गावरच जनावरांचा ठिय्या
यवतमाळ शहरातील दारव्हा, अमरावती, धामणगाव, नागपूर, पांढरकवडा मार्गावर जागोजागी मोकाट जनावरांचे कळप दिसतात. हे सर्व अत्यंत वर्दळीचे रस्ते आहेत. आता हे कळप दत्त चौक, जिल्हाधिकाºयांचे निवासस्थान, पोलीस अधीक्षक कार्यालय, बसस्थानक चौक, तहसील चौक या ठिकाणीही पाहायला मिळत आहेत. इतकेच नव्हेतर आता रस्ता दुभाजकांच्या मध्येही चरताना दिसतात. दररोजच्या या प्रकारानंतरही नगरपरिषद मात्र गप्प आहे.