इम्तियाज हत्याकांडातील मुख्य मारेकरी जेरबंद, दोघे अद्यापही फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 05:00 IST2021-07-28T05:00:00+5:302021-07-28T05:00:02+5:30
अंजुम खान लियाकत अली खान (४४) रा. गढी वाॅर्ड याची आई व इम्तियाज खान सरदार खान याचे वडील सरदार खान हे दोघे बहीण-भाऊ आहेत. शेतीच्या व्यवहारामधून वाद झाला होता. या वादामध्ये मुख्य सूत्रधाराने सरदार खान यांच्या परिवाराला पाहून घेतो अशी धमकी दिली होती. शेतीच्या कारणावरून चार लाख रुपयांची मागणी करून इम्तियाज खानला ठार केल्याची फिर्याद सरदार खान यांनी वसंत नगर पोलीस ठाण्यात दिली.

इम्तियाज हत्याकांडातील मुख्य मारेकरी जेरबंद, दोघे अद्यापही फरार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : शेतीच्या वादातून भरदिवसा एका तरुणाचा खून करण्यात आला. या प्रकरणातील अन्य तीन आरोपींना पोलिसांनी आधीच ताब्यात घेतले. मात्र सुपारी घेऊन हत्या करणारा मुख्य मारेकरी सय्यद असलम सय्यद सलीम रा. काळी दौलत खान ४८ तासांपासून फरार होता. त्यालाही आता पोलिसांनी कळंब तालुक्यातून ताब्यात घेतले. या प्रकरणातील एकंदर सातही आरोपींचा आता उलगडा झाला असून शेती विक्रीच्या वादातूनच इम्तियाज खानचा गेम करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
अंजुम खान लियाकत अली खान (४४) रा. गढी वाॅर्ड याची आई व इम्तियाज खान सरदार खान याचे वडील सरदार खान हे दोघे बहीण-भाऊ आहेत. शेतीच्या व्यवहारामधून वाद झाला होता. या वादामध्ये मुख्य सूत्रधाराने सरदार खान यांच्या परिवाराला पाहून घेतो अशी धमकी दिली होती. शेतीच्या कारणावरून चार लाख रुपयांची मागणी करून इम्तियाज खानला ठार केल्याची फिर्याद सरदार खान यांनी वसंत नगर पोलीस ठाण्यात दिली. एका विधिसंघर्ष बालकासह सय्यद असलम सय्यद सलीम (२८) रा. काळी दौ. या दोघांनी इम्तियाज खानला ठार केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी घटनास्थळ गाठून तपासाचे चक्र फिरवले. त्यात डीबी पथकाचे प्रमुख दीपक ताठे, जलाल शेख यांनी हत्याकांडातील शेख हाफिस शेख कादर (३०) रा. मोमिनपुरा व फैजल खान मुजहिद अली खान (२७) रा. बोरी इजारा ता. महागाव दोन आरोपींसह विधिसंघर्ष बालकाला अटक केली. २६ जुलै रोजी डीबी पथकाने पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराग जैन, शहरचे पोलीस निरीक्षक दिनेशचन्द्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक दीपक ढोमणे यांनी कळंब येथून ताब्यात घेतले. त्याला पोलीस निरीक्षक रवींद्र जेधे यांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे.
पुसद येथील गोळीबार प्रकरणातील असे आहेत सात आरोपी
इम्तियाज खान या युवकाची हत्या करण्यासाठी अंजुम खान लियाकत अली खान (४४) रा. गढी वाॅर्ड याने जेलमध्ये राहून सुपारी दिल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. तर घटनेच्या दिवशी एका विधिसंघर्ष बालकासह शेख हाफिस शेख कादर रा. मोमिनपुरा, फैजल खान मुजहिद अली खान रा. बोरी इजारा या तीन आरोपींना अटक झाली. मुख्य मारेकरी सय्यद असलम सय्यद सलीम रा. काळी दौलत खान याला कळंब तालुक्यातून अटक केली. यासह कमल खान लियाकत अली खान व उसमान शमीम या सात जणांनी मिळून हत्याकांड घडविल्याचे निष्पन्न झाले आहे.