चौथीचा महेश जेव्हा मुख्यमंत्री बनतो..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 22:35 IST2018-07-24T22:34:41+5:302018-07-24T22:35:36+5:30
अत्यंत तरुण वयात मुख्यमंत्रिपद भूषविल्याचा इतिहास सध्या शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस या धुरिणींच्या नावे आहे. पण जिल्ह्यात त्यापेक्षाही कमी म्हणजे बालवयातच मुख्यमंत्री म्हणून विजय मिळविणारा विद्यार्थी नेता पुढे आला आहे... महेश लक्ष्मण इंगोले!

चौथीचा महेश जेव्हा मुख्यमंत्री बनतो..!
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अत्यंत तरुण वयात मुख्यमंत्रिपद भूषविल्याचा इतिहास सध्या शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस या धुरिणींच्या नावे आहे. पण जिल्ह्यात त्यापेक्षाही कमी म्हणजे बालवयातच मुख्यमंत्री म्हणून विजय मिळविणारा विद्यार्थी नेता पुढे आला आहे... महेश लक्ष्मण इंगोले!
थांबा... राजकीय कार्यकर्त्यांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही. हा मुख्यमंत्री शाळेपुरता मर्यादित आहे. लवकरच आपल्या इतर मंत्र्यांची नावे जाहीर करणार असल्याचे त्याने जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांना निवडणुकीचा अभ्यास करता यावा, म्हणून येळाबारा (ता. यवतमाळ) येथील जिल्हा परिषद शाळेत प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रमच राबविण्यात आला. त्यातून मुख्यमंत्रीच नव्हेतर, मतदान अधिकारी, मतदान केंद्र अधिकारीही विद्यार्थीच बनलेत.
या शाळेत प्रत्येक आठवड्यात ‘दप्तरमुक्त शनिवार’ उपक्रम राबविला जात आहे. शनिवारी मुलांनी दप्तर न आणता, विविध स्पर्धा, गायन-वादन, व्यायाम, कवायत असे उपक्रम राबविले जातात. त्या अंतर्गत २१ जुलैच्या शनिवारी ‘शालेय मंत्रिमंडळासाठी निवडणूक’ घेण्यात आली. प्रत्यक्ष गावात प्रचार कसा केला जातो, याचाही विद्यार्थ्यांना अनुभव देण्यात आला. यात प्रत्यक्ष मतदान कक्ष साकारण्यात आला. आठ विद्यार्थी उमेदवार झाले.
मुख्याध्यापक पांडुरंग भोयर, शिक्षक शिवचंद्र गिरी, देवेंद्र लोटे, किशोर डाफे, पद्मा वैद्य, शशिकला टेकाम आदींनी हा उपक्रम राबविला.
एक मत ‘नोटा’ला
शाळेचा मुख्यमंत्री निवडण्यासाठी झालेल्या मतदानात दुसरी, तिसरी आणि चौथीच्या एकूण ५७ विद्यार्थ्यांनी मतदान केले. त्यातील सर्वाधिक मते घेऊन महेश इंगोले मुख्यमंत्री झाला. विशेष म्हणजे, ५७ पैकी एका विद्यार्थ्यांने चक्क ‘नोटा’चा (एकही उमेदवार पसंत नाही) पर्याय निवडला. मुख्यमंत्र्यासह इतर मंत्र्यांचा शपथविधीही मंगळवारी पार पडला आणि खातेवाटपही झाले.