बेवारस मृतदेहावरून उलगडले प्रेमप्रकरणातून झालेले हत्याकांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2021 05:00 IST2021-10-15T05:00:00+5:302021-10-15T05:00:29+5:30
केंद्रीय राखीव पोलीस बलात कार्यरत मनोज भाबट हे गेल्या काही दिवसांपासून घरी परतले नव्हते. ते गावी गेल्याची माहिती मनोज भाबट यांची पत्नी मोनिका भाबट (३७) यांनी पोलिसांना दिली. त्याचवेळी देवळीचे ठाणेदार व तपास अधिकारी धनंजय सायरे यांना मोनिका यांच्यावर संशय आला. पती पाच दिवसांपासून बेपत्ता आहे. त्याच्याशी संपर्क होत नाही, असे असतानाही तिची वर्तणूक एक पत्नी म्हणून अतिशय सामान्य होती.

बेवारस मृतदेहावरून उलगडले प्रेमप्रकरणातून झालेले हत्याकांड
सुरेंद्र राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील वाफगाव शिवारात रोडच्या पुलाखाली कुजलेला मृतदेह आढळून आला. याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली. सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद घेऊन गुन्ह्याचा तपास सुरू केला. मृतदेहाची ओळख पटविण्याचे आव्हान होते. सलग चार दिवस मृतदेह सापडलेल्या परिसरात कसून शोध घेण्यात आला. तेव्हा एक आधारकार्ड आढळले. त्या आधार कार्डवरील व्यक्तीचा शोध सुरू करण्यात आला. तो यवतमाळातील रहिवासी असून नागपूर येथे सीआरपीएफ कॅम्पमध्ये राहत असल्याची माहिती मिळाली.
केंद्रीय राखीव पोलीस बलात कार्यरत मनोज भाबट हे गेल्या काही दिवसांपासून घरी परतले नव्हते. ते गावी गेल्याची माहिती मनोज भाबट यांची पत्नी मोनिका भाबट (३७) यांनी पोलिसांना दिली. त्याचवेळी देवळीचे ठाणेदार व तपास अधिकारी धनंजय सायरे यांना मोनिका यांच्यावर संशय आला. पती पाच दिवसांपासून बेपत्ता आहे. त्याच्याशी संपर्क होत नाही, असे असतानाही तिची वर्तणूक एक पत्नी म्हणून अतिशय सामान्य होती. पोलिसांनी मोनिकावर लक्ष केंद्रित करून तिच्यावर बारीक नजर ठेवली. इतकेच नव्हे तर ती मोबाईलद्वारे कोणाच्या संपर्कात आहे, यावरही पोलिसांचा वाॅच होता. मोनिका ही प्रमोद माधव रन्नावरे (३९) रा.वडगाव याच्या संपर्कात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी परस्परच प्रमोदला उचलले. त्याने गुन्ह्याची कबुली देत मनोज भाबट याचा खून केल्याचे सांगितले. या गुन्ह्यात त्याने नितीन मधुकर घाडगे (२७) रा.वडगाव, आशिष रामदास कठाळे रा.करळगाव यांची मदत घेतल्याचेही सांगितले. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यातील शस्त्र, रक्ताने माखलेले कापड, गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त केले. त्यानंतर मोनिका भाबट हिला ताब्यात घेतले. तब्बल २९ साक्षीदार वर्धा सत्र न्यायालयात हजर केले. त्यावरून २७ सप्टेंबर २०१६ रोजी आरोपींना जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. आरोपींनी या शिक्षेच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली; मात्र तिथेही पोलिसांचा योग्य तपास व दोषारोपपत्रामुळे न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांनी वर्धा सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवत आरोपींची जन्मठेप कायम केली. केवळ योग्य दोषारोपपत्र व तपासामुळे आरोपी कारागृहात आहेत.
तपासाकडे होते दोन जिल्ह्यांचे लक्ष
केंद्रीय राखीव पोलीस बलात कार्यरत असलेले मनोज भाबट (रा.सीआरपीएफ कॅम्प, नागपूर) यांची पत्नी मोनिका भाबट व तिचा प्रियकर प्रमोद माधव रन्नावरे (रा.वडगाव) यांनी कट रचून १ ऑक्टोबर २०१३ रोजी चालत्या वाहनात वार करून हत्या केली. मृतदेह वर्धा जिल्ह्यातील देवळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाफगाव शिवारातील पुलाखाली फेकून दिला. या बेवारस मृतदेहाच्या तपासाकडे दोन जिल्ह्यांचे लक्ष होते.
खटल्यातील सरकारी वकील एसीबीच्या जाळ्यात
देवळी पोलिसांनी अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून त्याच्या हत्येमागे पत्नीचे प्रेमप्रकरण असल्याचे दोषाराेपपत्र वर्धा सत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणाची ट्रायल सुरू झाली असताना आरोपी निर्दोष सुटतील, या प्रकरणात शिक्षा होणार नाही, असे मृताच्या बहिणीला सरकारी वकिलाने सांगितले होते. दरम्यान, या सरकारी वकिलाला तीन लाख रुपयांची लाच घेताना एसीबीने अटक केली. नंतर २७ सप्टेंबर २०१६ ला सत्र न्यायालयाने २९ साक्षीदारांच्या तपासणीनंतर आरोपींना जन्मठेप ठोठावली.