परतीच्या पावसाने राज्यात साडेतीन हजार कोटींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 19:40 IST2019-11-09T19:37:39+5:302019-11-09T19:40:10+5:30
राज्यभरात परतीच्या पावसाने होणाऱ्या नुकसानीचा कहर सुरूच आहे. महसूल, कृषी आणि ग्रामसेवकांनी केलेल्या संयुक्त पंचनाम्यानुसार ५५ लाख हेक्टरवर नुकसान झाले आहे.

परतीच्या पावसाने राज्यात साडेतीन हजार कोटींचे नुकसान
रूपेश उत्त्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्यभरात परतीच्या पावसाने होणाऱ्या नुकसानीचा कहर सुरूच आहे. महसूल, कृषी आणि ग्रामसेवकांनी केलेल्या संयुक्त पंचनाम्यानुसार ५५ लाख हेक्टरवर नुकसान झाले आहे. हे नुकसान साडेतीन हजार कोटींच्या घरात असल्याचा अंदाज आयुक्तांनी वर्तविला आहे. पंचनामे करण्यासाठी २१ लाख शेतकऱ्यांचे अर्ज विमा कंपनी प्रतिनिधीकडे आले आहे. नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी ७२ तासात विमाधारकांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. सतत कोसळणाºया पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे जथ्थे तालुका कृषी कार्यालयात धडकत आहे. या शेतकऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ मदत देण्याची मागणी केली आहे.
२१ लाख शेतकऱ्यांनी पंचनामे करण्यासाठी आतापर्यंत अर्ज सादर केले आहेत. यामध्ये बागायतदार शेतकऱ्यांसोबतच, कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी यासह इतर पिकांच्या शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यापैकी ६० ते ७० टक्के शेतकऱ्यांच्या पंचनाम्यांचा अहवाल आला आहे.
सर्वाधिक नुकसान द्राक्ष बागांचे
कुठल्या पिकाचे किती नुकसान झाले, याची माहिती स्पष्ट झाल्यानंतर नुकसानीचा अंतिम अहवाल पुढे येणार आहे. ५४ लाख ८० हजार हेक्टरवर झालेल्या नुकसानीच्या प्राथमिक अंदाजात द्राक्ष बागांचे सर्वाधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
राज्यात आतापर्यंत साडेतीन हजार कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने नुकसानीचा आकडा वाढणार आहे. फळबागा आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
- हरी बाबतीवाल, उपसंचालक, राष्ट्रीय आपत्ती निवारण कक्ष, पुणे