'आदित्य ठाकरेंसाठी मतदारसंघ सोडतो', युवासेना प्रमुखांना राज्यमंत्र्यांची ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 18:24 IST2019-08-29T18:21:25+5:302019-08-29T18:24:07+5:30
आदित्य यांच्यासाठी मुंबईतील सुरक्षित मतदारसंघाची चाचपणी केली जात आहे.

'आदित्य ठाकरेंसाठी मतदारसंघ सोडतो', युवासेना प्रमुखांना राज्यमंत्र्यांची ऑफर
मुकेश इंगोले
दारव्हा (यवतमाळ) : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना शिवसेना नेते, महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी आपल्या दिग्रस विधानसभा मतदारसंघातून लढण्याची थेट ऑफर दिली आहे. त्यावर आदित्य यांनी स्मीतहास्य व हस्तांदोलन करीत संजय राठोड यांना प्रतिसादही दिला. राज्यात भाजप-शिवसेना युती झाल्यास युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री पदाचे उमेदवार होऊ शकतात. त्यासाठी ते विधानसभा निवडणूक लढणार आहेत, अशी चर्चा आहे.
आदित्य यांच्यासाठी मुंबईतील सुरक्षित मतदारसंघाची चाचपणी केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई शहर अध्यक्षांना शिवबंधन बांधण्यात आल्याने त्यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघात युवा सेना प्रमुखांना शिवसेनेचे उमेदवार म्हणून उतरविण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती आहे. आदित्य ठाकरे यांच्यासाठी विधानसभा मतदारसंघाची शोधाशोध सुरू असतानाच बुधवारी दिग्रसचे शिवसेनेचे आमदार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनीच थेट आदित्य यांच्यासाठी आपला सुरक्षित दिग्रस विधानसभा मतदारसंघ सोडण्याची जाहीर तयारी दर्शविली. आपण केवळ नामांकन अर्ज भरण्यासाठी एकदा दिग्रसमध्ये या, त्यानंतर तुमच्या विजयाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आम्ही ‘मातोश्री’वर येऊ, तुम्ही दिग्रसमधून लढण्याचा निर्णय घ्या, प्रतिस्पर्धी सर्व विरोधकांचे डिपॉझिट जप्त करण्याची जबाबदारी आम्ही घेतो, अशा शब्दात संजय राठोड यांनी आदित्य ठाकरे यांना ऑफर दिली. यावेळी जनतेतूनही या ऑफरला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
तुमच्याकडे राज्यातील जनता मोठ्या अपेक्षेने पाहत आहे, तुम्हीच राज्याला सुजलाम सुफलाम करू शकता, तुम्हीच राज्याचे नेतृत्व करावे ही जनतेची मागणी व अपेक्षा आहे. त्यामुळे निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ आहे, तुम्ही दिग्रस विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढा, असा आग्रह संजय राठोड यांनी आदित्य यांच्यापुढे ठेवला. राठोड यांच्या भाषणानंतर आदित्य ठाकरे यांनी उभे राहून हसतमुखाने संजय राठोड यांच्याशी हस्तांदोलन केले.