वकिलाला मुलाचे अपहरण आणि जिवे मारण्याची दिली धमकी; कौटुंबिक न्यायालयाच्या परिसरातच वकील संघ आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 20:37 IST2026-01-24T20:35:38+5:302026-01-24T20:37:20+5:30
Yavatmal : कौटुंबिक न्यायालयात विरोधात केस लढणाऱ्या वकिलाला आरोपीने चक्क न्यायालयाच्या परिसरातच मुलाचे अपहरण आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.

Lawyer threatened with kidnapping and killing of child; Lawyers' union aggressive in family court premises
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कौटुंबिक न्यायालयात विरोधात केस लढणाऱ्या वकिलाला आरोपीने चक्क न्यायालयाच्या परिसरातच मुलाचे अपहरण आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. त्यानंतर वकील संघ आक्रमक झाल्याने तणावाची स्थिती उद्भवली होती. त्यानंतर यवतमाळ शहर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.
अॅड. तुषार दीपक देशपांडे (वय ४३, रा. शिंदेनगर, यवतमाळ) असे फिर्यादीचे नाव आहे. ते भाग्यश्री आनंद किडीले (वय ३७, रा. शिंदेनगर, यवतमाळ) यांची केस पाच वर्षांपासून कौटुंबिक न्यायालयात लढत आहेत. २३ जानेवारी रोजी तारीख असल्याने तुषार देशपांडे हे पक्षकारासह दुपारी दीड वाजेच्या सुमारास येथील कौटुंबिक न्यायालयात आले. न्यायालयात केस प्रकरणात दोन्ही बाजूच्या वकिलांनी न्यायाधीशांसमक्ष युक्तिवाद केला. त्यानंतर देशपांडे पक्षकारासह न्यायालयाच्या बाहेर आले.
याचवेळी आरोपी आनंद प्रकाश किडीले (वय ४१, रा. बेलतरोडी, नागपूर) हा त्यांच्या जवळ आला. अॅड. देशपांडे यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून जिवे मारण्याची व मुलाला उचलून नेण्याची धमकी दिली. त्यामुळे देशपांडे यांनी आरोपीविरोधात न्यायाधीशांकडे तक्रार केली. त्यानंतर न्यायाधीशांनी आरोपीचा पुकारा केला असता तो हजर झाला नाही. वकिलाला आरोपीकडून न्यायालयातच जिवे मारण्याची धमकी दिली जात असल्याने इतर वकील मंडळी कौटुंबिक न्यायालय परिसरात एकत्रित आले.
त्यांनी या घटनेचा निषेध करीत आरोपीला अटक करण्याची मागणी केली. वकिलांचा मोठा फौजफाटा पाहून आरोपी न्यायालयातच लपला.
तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याची स्थिती उद्भवल्याने यवतमाळ शहर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. अॅड. तुषार देशपांडे यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी आरोपी आनंद किडीले याच्याविरुद्ध कलम २९६, ३५२ भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
२३ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास ही घटना कौटुंबिक न्यायालयाच्या परिसरात घडली. आरोपीने दिलेल्या धमकीने वकील मंडळी चांगलीच आक्रमक झाली होती. या घटनेचा वकील संघाकडून जोरदार निषेध करण्यात आला.
वकील संघाकडून निषेध, एसपी, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
वकिलाला थेट न्यायालयातच जिवे मारण्याची धमकी आरोपीने दिल्याचे प्रकरण घडताच वकील संघाकडून निषेध नोंदविण्यात आला. तसेच जिल्हाधिकारी विकास मीना आणि जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांना निवेदन देऊन आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी फॅमिली कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. वैभव एडके, उपाध्यक्ष अॅड. जीत एस. पवार आदी उपस्थित होते.