50 लाखाच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या व्यापाऱ्याच्या मुलाची अखेर सुखरूप सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 00:46 IST2019-07-15T23:40:50+5:302019-07-16T00:46:06+5:30
50 लाखाच्या खंडणीची मागणी करणाऱ्या टोळीचा अखेर अवधुतवाडी पोलीस ठाण्याच्या DB Scodने अवघ्या काही तासात छडा लावला.

50 लाखाच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या व्यापाऱ्याच्या मुलाची अखेर सुखरूप सुटका
यवतमाळ : येथील सायकल विक्रेत्याच्या मुलाचे अपहरण करून 50 लाखाच्या खंडणीची मागणी करणाऱ्या टोळीचा अखेर अवधुतवाडी पोलीस ठाण्याच्या डीबी स्कॉडनं अवघ्या काही तासात छडा लावला. या प्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली असून एक आरोपी मुंबईकडे पळून गेला आहे, त्याच्या ही शोधात पोलिसांची पथके गेली आहेत. या प्रकरणात अपहृत मुलाच्या फिर्यादी वडिलांसोबत सतत पोलिसांपुढे राहणार शुभम तोलवाणी (भाजयुमो पदाधिकारी) नामक युवकच या अपहरण कांडचा सूत्रधार निघाला. टोलवाणी याच्यावर क्रिकेट सट्ट्यातून मोठे कर्ज झाले, ते चुकविण्यासाठी त्याने हर्षचे अपहरण केले. टोलवाणीने यासाठी यवतमाळमधील गुंड उन्नरकाठ याला सुपारी दिली. हर्षला घेऊन हे दारव्हा रोडवरील जंगलात गेले. तेथे हर्षला बेल्टने जबर मारहाण करण्यात आली. नंतर त्याचा व्हीडिओ बनविण्यात आला, त्यात हर्षच्या वडिलांकडे 50 लाखांची मागणी करण्यात आली. सायंकाळी हर्षला घेऊन आरोपी यवतमाळ शहरातील बोरले नगर येथे आले. दरम्यान API लांडगे यांना शुभमवर संशय आला. त्याला पोलीस मुख्यालयात आणून प्रश्नांची सरबत्ती करताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तो पोलिसांसोबत राहून तपासाबाबत अपडेट करीत होता. पोलिसांनी अवघ्या 10 तासांत गुन्ह्याचा छडा लावला.
हर्ष इश्वर नचवणी (१६, रा. सिंधी कॅम्प), असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. शहरातील शिवाजी गार्डन जवळ हर्षची दुचाकी पडून होती.