कापूस बियाण्यामुळे उत्पादन न मिळाल्याने 'कावेरी सीड्स' कंपनीला दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 11:16 IST2025-05-17T11:16:11+5:302025-05-17T11:16:48+5:30

कापूस बियाणे सदोष : ग्राहक आयोगाने ठोकला दंड

'Kaveri Seeds' company fined for non-production of cotton seeds | कापूस बियाण्यामुळे उत्पादन न मिळाल्याने 'कावेरी सीड्स' कंपनीला दंड

'Kaveri Seeds' company fined for non-production of cotton seeds

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ :
सदोष कापूस बियाण्यामुळे उत्पादन न मिळाल्याच्या प्रकरणात यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगाने शेतकऱ्याच्या बाजूने निकाल देत तेलंगणातील 'कावेरी सीड्स' कंपनीला दंड ठोठावला आहे. शासनाच्या तक्रार निवारण समितीनेही सदर बियाणे सदोष असल्याचा अहवाल दिला होता, हे विशेष.


मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ येथील भास्कर वासुदेव चटकी यांनी मार्डी (ता. मारेगाव) येथील स्वामी कृषी केंद्रातून मनीमेकर-बीजीर या कापसाच्या वाणाचे पाकीट घेतले होते. अडीच हेक्टर क्षेत्रात हे बियाणे पेरणी करून मशागत करण्यात आली. तथापि, बोंडअळी आल्यामुळे भास्कर चटकी यांना कपाशीचे उत्पादन झाले नाही. तक्रार निवारण समितीने चटकी यांच्या शेताला भेट देऊन अहवाल सादर केला. त्यामध्ये त्यांनी पेरलेले बियाणे सदोष असल्याचे नमूद केले. यासंदर्भात कंपनीकडे भरपाई मागितली असता त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.


'नॉन बीटी' पेरली नाही
बीटीच्या पाकिटामध्ये नॉन बीटी बियाणे उपलब्ध करून दिले जाते. शेतकरी भास्कर चटकी यांनी नॉन बीटी पेरली नाही. जागा व्यापली जाते म्हणून ही बाब टाळण्यात आली, अशी बाजू कंपनीने आपल्या बचावासाठी मांडली होती.


अडीच लाख भरपाई द्यावी
शेतकरी भास्कर चटकी यांना कपाशीचे उत्पादन झाले नाही. त्यामुळे कावेरी सीड्स कंपनीने त्यांना दोन लाख ५२ हजार रुपये नुकसानभरपाई आणि शारीरिक व मानसिक त्रासापोटी २० हजार रुपये द्यावे, असा आदेश आयोगाने दिला. भास्कर चटकी यांचे ६८ क्विंटल कापसाचे नुकसान झाले. त्यांना महाराष्ट्र शासनाकडून आठ हजार रुपये नुकसान भरपाई मिळाली होती.


ग्राहक आयोगात दाद
कंपनी, कृषी केंद्राकडून प्रतिसाद मिळत नसल्याने भास्कर चटकी यांनी यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली. आयोगाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र उल्हास मराठे, सदस्य अमृता वैद्य यांच्या उपस्थितीत या प्रकरणावर सुनावणी झाली. यामध्ये कावेरी कंपनी निर्मित कपाशी बियाणे सदोष निघाल्याचे सिद्ध झाले.

Web Title: 'Kaveri Seeds' company fined for non-production of cotton seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.