कळंब पंचायत समितीत अफरातफर

By Admin | Updated: September 11, 2015 02:57 IST2015-09-11T02:57:22+5:302015-09-11T02:57:22+5:30

पंचायत समितीचे लाखो रुपयांचे साहित्य भांडारगृह व इतर विविध ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे.

Kalam Panchayat Samiti in the court | कळंब पंचायत समितीत अफरातफर

कळंब पंचायत समितीत अफरातफर

चौकशी समिती : स्टॉक बुकवरील साहित्य गायब
गजानन अक्कलवार : कळंब

पंचायत समितीचे लाखो रुपयांचे साहित्य भांडारगृह व इतर विविध ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. त्या संबंधीची नोंद स्टॉक बुकमध्येही आहे. परंतु, तीन संगणकांसह अनेक किमती साहित्य गायब झाल्याचे उघडकीस आले आहे. या गंभीर प्रकारामुळे पंचायत समिती प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
दरवर्षी ३० जून रोजी भांडारगृहाची तपासणी केली जाते. स्टॉक बुकनुसार सर्व साहित्य सुस्थितीत आहे की नाही, याची खातरजमा केली जाते. त्यानंतर तसा अहवाल गटविकास अधिकारी यांच्याकडून जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठवावा लागतो. विशेष म्हणजे, त्यासंबंधीची प्रमाणपत्रे सादर करावी लागतात. परंतु, जून महिन्यात करण्यात आलेल्या भांडारगृह व इतर ठिकाणच्या साहित्य तपासणीमध्ये मोठी अफरातफर झाल्याचे आढळून आले. प्रकरण वेळीच रफादफा करण्याच्या हालचाली सुरु झाल्या. त्यासाठी सुरवातीला भांडारपालाला समज देऊन सर्व साहित्याची जुळवाजुळव करण्यास सांगण्यात आले. परंतु, आॅक्टोबर महिना उलटून गेल्यानंतरही गायब साहित्याची जुळवाजुळव करण्यात आली नाही. परिणामी, गटविकास अधिकारी डॉ. मनोहर नाल्हे यांनी सहायक गटविकास अधिकारी पद्माकर मडावी यांच्या नेतृत्वात एक चौकशी समिती गठीत केली. चौकशी समितीमध्ये सहायक लेखाधिकारी ओमप्रकाश गौरकार, सहायक प्रशासन अधिकारी बी. पी. माघाडे, कृषी विस्तार अधिकारी ज्योती नेहारे, विस्तार अधिकारी तुषार महाजन यांचा समावेश आहे.
मागील काही दिवसांपासून चौकशी समितीचे सदस्य स्टॉक बुकवर नोंद असलेल्या साहित्याची प्रत्यक्ष खातरजमा करीत आहे. त्यामध्ये तीन संगणकासह, सिंचन पाईप, अनेक खुर्च्या व टेबल, पंखे, कपाट, ड्रम आदीसह इतर साहित्य लंपास असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेमार्फत चालविल्या जाणाऱ्या अनेक योजनांचे साहित्य या ठिकाणी ठेवले जाते. यामध्ये डिझेल इंजिन, सिंचन पाईप, सायकली, ताडपत्री, स्प्रे-पंप, टिनपत्रे, बैलगाडी, शिलाई मशीन, शेतीपयोगी साहित्य आदी साहित्याचा समावेश असतो. या वस्तूही स्टॉक बुकनुसार आहे की नाही, याची तपासणी करणे गरजेची झाले आहे. तसेच सबसीडी सोडून जमा रकमेचा हिशेबही तपासण्याची गरज आहे.

Web Title: Kalam Panchayat Samiti in the court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.