महिलेचा खून करून दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 22:24 IST2018-03-31T22:24:55+5:302018-03-31T22:24:55+5:30

घाटंजीपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या मानोलीजवळील आमडी शेतशिवारात एका महिलेचा खून करून दागिने लंपास करण्यात आले. ही घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली.

 Jewelry lynch | महिलेचा खून करून दागिने लंपास

महिलेचा खून करून दागिने लंपास

ठळक मुद्दे आमडी शिवारातील घटना : शेतात काम करीत असताना सशस्त्र हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : घाटंजीपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या मानोलीजवळील आमडी शेतशिवारात एका महिलेचा खून करून दागिने लंपास करण्यात आले. ही घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली.
वर्षा गुणवंत बावणे (३७) रा. मानोली असे मृत शेतकरी महिलेचे नाव आहे. शुक्रवारी नेहमीप्रमाणे वर्षा गावाजवळील आमडी शिवारातील आपल्या शेतात गेली होती. तिला पतीने शेतात सोडून दिले होते. सायंकाळी पती गुणवंत बावणे तिला आणण्यासाठी दुचाकीने शेतात गेला. त्यावेळी वर्षा शेतात निपचित पडून असल्याचे त्याला दिसून आले. तिच्या हातपाय व चेहऱ्यावर गंभीर जखमा आढळून आल्या. तसेच वर्षाच्या अंगावरील अंदाजे ३० हजार रुपयांचे दागिनेही गायब असल्याचे दिसून आले. गुणवंतने गावात परत येऊन पुतण्या गजानन बावणे याला सर्व प्रकार कथन केला.
यानंतर गजानन बावणे याने घाटंजी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटंजीला रवाना केला. गजाननच्या तक्रारीवरून पोलिसांनी तूर्तास अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. वर्षाचा खून दागिन्यांसाठी झाला, की या खुनामागे आणखी दुसरेच कारण आहे, याचा घाटंजी पोलीस तपास करीत आहे.

जिल्ह्यात खुनाचे सत्र कायमच
गेल्या वर्षभरातपासून जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरू झाले. नवीन वर्षातही हे सत्र सुरूच असल्याचे दिसून येते. यापूर्वी वणी, पांढरकवडा, राळेगाव, पुसद आदी तालुक्यात खुनाच्या घटना घडल्या. गेल्या तीन महिन्यात यवतमाळ शहरातही खून सत्र सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title:  Jewelry lynch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून