महानिरीक्षकांच्या पथकाची तीन महिन्यांपासून चौकशी सुरुच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 05:00 IST2020-06-11T05:00:00+5:302020-06-11T05:00:27+5:30
कथित सीए हरीश चव्हाण (भांडेगाव ता. दारव्हा) यांची ३५ लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली होती. यातील आरोपी संजय साबने याला कर्नाटकाच्या बेळगावातून अटक करण्यात आली. मात्र त्याचा पीसीआर न घेता लगेच सोडता यावे व प्रकरणाची तडजोड व्हावी यासाठी सहायक पोलीस निरीक्षक गोरख चौधर यांनी साबने याच्या नातेवाईकांकडून एक कोटी रुपयांची वसुली केली होती.

महानिरीक्षकांच्या पथकाची तीन महिन्यांपासून चौकशी सुरुच !
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पारवा ठाणेदार गोरख चौधर यांच्या एक कोटींच्या अवैध वसुली प्रकरणात पोलीस महानिरीक्षकांनी चौकशीचे आदेश दिले होते. परंतु गेल्या तीन महिन्यांपासून ही चौकशी सुरूच असल्याने या पथकाकडे साशंकतेने पाहिले जात आहे. चौकशीला एवढे दिवस लागण्यामागे नेमके कारण काय, प्रकरण गंभीर आहे की, राजकीय दबावातून टाईमपास केला जात आहे, याची चर्चा होताना दिसते.
कथित सीए हरीश चव्हाण (भांडेगाव ता. दारव्हा) यांची ३५ लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली होती. यातील आरोपी संजय साबने याला कर्नाटकाच्या बेळगावातून अटक करण्यात आली. मात्र त्याचा पीसीआर न घेता लगेच सोडता यावे व प्रकरणाची तडजोड व्हावी यासाठी सहायक पोलीस निरीक्षक गोरख चौधर यांनी साबने याच्या नातेवाईकांकडून एक कोटी रुपयांची वसुली केली होती. ‘लोकमत’ने या प्रकरणाचा भंडाफोड केला. तेव्हा हे प्रकरण बनावट नोटा, नोटा दुप्पट करणे आणि बोगस पदव्यांचे असल्याचे निष्पन्न झाले. अवधूतवाडी पोलीस ठाण्यात असताना चौधर यांनी हा एक कोटींचा कारनामा केला होता. एक कोटींच्या या प्रकरणात अनेक जण ‘वाटेकरी’ आहेत. जिल्हास्तरावर चौधर प्रकरणात कारवाई होणार नाही याची खात्री पटल्याने अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी ६ मार्च रोजी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले. ही चौकशी आपले वाचक उपअधीक्षक गिरीष बोबडे यांच्याकडे सोपविण्यात आली. बोबडे यांनी लगेच चौकशीला प्रारंभही केला होता. या प्रकरणात दोन्ही पक्ष समोर नसतानाही केवळ जादा पैशासाठी नोटरी करून देणाऱ्या वकिलाच्या घरावरही चौकशी पथकाने धडक दिली होती. दोन लाख रुपये अॅडव्हॉन्स देऊन बारावी सीबीएसईची गुणपत्रिका मिळविणाऱ्या पांढरकवड्यातील राजकीय पदाधिकाºयाचीही या पथकाने चौकशी केली.
एपीआय गोरख चौधरचे कारनामे सुरूच
चौकशीचा अहवालच न आल्याने एक कोटींच्या या वसुलीतील ‘वाटेकरी’ नेमके कोण कोण ही बाब गुलदस्त्यात आहे. पोलीस प्रशासनही महानिरीक्षकांच्या चौकशी अहवालाच्या प्रतीक्षेचा आढावा घेऊन चौधर यांच्यावर कारवाई करणे टाळत आहे. प्रशासनाचे अप्रत्यक्ष अभय मिळत असल्याने तिकडे पारवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोरख चौधर यांचे कारनामे सुरूच आहेत. त्यांचे एक प्रकरण न्यायालयात गेले आहे. सोने देण्याच्या नावाने दहा लाखांची फसवणूक झाल्याचे प्रकरणही गाजते आहे.
चौकशी अचानक मंदावली कशी ?
सुरुवातीला चौकशीने वेग घेतला असताना गेल्या तीन महिन्यांपासून मात्र ही चौकशी थांबली आहे. यामागील रहस्य गुलदस्त्यात आहे. चौधर यांनी बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत पोलीस प्रशासनाकडे ‘लिंक’ लावली होती. कदाचित त्यातून तर चौकशीची गती मंदावली नाही ना, अशी शंकाही पोलीस दलात व्यक्त केली जात आहे.