औद्योगिक वसाहती नावालाच

By Admin | Updated: January 6, 2015 23:09 IST2015-01-06T23:09:40+5:302015-01-06T23:09:40+5:30

जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारांना स्थर्य निर्माण करण्यासाठी जिल्ह्यात आता उद्योगांशिवाय पर्याय नाही. परंतु यवतमाळ जिल्ह्यातील उद्योग

Industrial colony name | औद्योगिक वसाहती नावालाच

औद्योगिक वसाहती नावालाच

यवतमाळ : जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारांना स्थर्य निर्माण करण्यासाठी जिल्ह्यात आता उद्योगांशिवाय पर्याय नाही. परंतु यवतमाळ जिल्ह्यातील उद्योग व्यवस्था अतिशय निराशाजनक आहे. औद्योगिक वसाहती ओसाड पडल्या आहे. सोयी-सुविधांअभावी येथे उद्योग सुरू करण्यास कोणीही इच्छूक असल्याचे दिसून येत नाही.
यवतमाळ, पुसद, वणी या तीन औद्योगिक वसाहती सोडल्यास जिल्ह्यात इतर तालुक्यांमध्ये उद्योग नसल्यासारखेच आहेत. उल्लेखनीय असा एकही उद्योग कार्यरत नसल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. एमआयडीसीसाठी जागा राखीव आहे. भूखंडही पडले आहे. काही ठिकाणी ते वितरितही करण्यात आले आहे. परंतु वीज, पाणी, रस्ते आणि उद्योगासाठी लागणारे पोषक वातावरणच नसल्यामुळे कुणीही मोठा उद्योजक आपला उद्योग सुरू करण्यास तयार नाही. या औद्योगिक वसाहतींमधील भूखंडदेखील सहजासहजी उपलब्ध होत नाही. त्यामुळे स्थानिक बेरोजगारांची इच्छा असूनही ते छोटा-मोठा व्यवसाय सुरू करत नाही. दारव्हा येथे लघु औद्योगिक क्षेत्राचे १०.२६ हेक्टर आर औद्योगिक क्षेत्र असून केवळ ६.०३ हेक्टर क्षेत्रातील भूखंड वितरित करण्यात आले आहे. येथे सध्या छोटे-मोठे दहा उद्योग सुरू असून गेल्या काही वर्षात पाच उद्योग बंद पडले आहे. दिग्रस लघु एमआयडीसीत १८.३२ हेक्टर आर विकसित क्षेत्र असले तरी केवळ ०.६८ हेक्टर आर क्षेत्र वाटप झाले आहे आणि येथे सुरू असलेला एकमेव उद्योगही अनेक वर्षांपूर्वी बंद पडला.
घाटंजी लघु औद्योगिक क्षेत्र हे ९.५ हेक्टर आरचे आहे. त्यातील ४.३७ क्षेत्रातील भूखंड वितरित केले असून येथे केवळ पाच उद्योग कसेबसे तग धरून आहे. महागाव लघु औद्योगिक वसाहत ७.९७ हेक्टर आर क्षेत्राचे असून येथे केवळ ०.६२ मधील एकच भूखंड वितरित करण्यात आला आहे. आणि केवळ एकच उद्योग सुरू आहे. मारेगाव औद्योगिक वसाहत केवळ नावालाच आहे. १०.४५ हेक्टर आर जागा विकसित केली असली तरी पुढे कोणती प्रक्रिया येथे राबविण्यात आली नसल्याने उद्योगच नाही. पांढरकवड्याचीही अशीच परिस्थिती आहे. इतर ठिकाणी तर केवळ एमआयडीसीची फलक लागले आहे तर काही ठिकाणी ते फलक कोणी काढून नेले, हे सुद्धा संबंधित विभागाला माहीत नाही.
नाही म्हणायला यवतमाळ येथे १४०, पुसद २२, वणी ४२ आणि उमरखेड येथे १५ उद्योग सुरू आहे. परंतु यातूनही फार मोठा रोजगार उपलब्ध झालेला नाही. आवश्यक त्या सोयी-सुविधांअभावी एमआयडीसी क्षेत्र बकाल झाले आहे. तर आर्णी, नेर, राळेगाव येथे औद्योगिक क्षेत्र नव्याने सुरू करण्याची गरज आहे. याकडे राज्यात सत्तांतरानंतर आलेल्या नवीन उद्योग मंत्र्यांनी लक्ष दिल्याशिवाय जिल्ह्यातील औद्योगिक विकास होणे शक्य नसल्याचेच दिसून येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Industrial colony name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.