बेड्या घालून द्यावी लागली आईच्या चितेला भडाग्नी
By Admin | Updated: October 27, 2014 22:44 IST2014-10-27T22:44:17+5:302014-10-27T22:44:17+5:30
प्रेमप्रकरणात उद्ध्वस्त होऊन तुरुंगात गेलेल्या एका तरुणावर हातात बेड्या घालून आईच्या चितेला भडाग्नी देण्याची वेळ आली. नेर शहरात रविवारी या मुलाने आईवर अंत्यसंस्कार केले.

बेड्या घालून द्यावी लागली आईच्या चितेला भडाग्नी
प्रेमप्रकरणातून तुरुंगात : अखेरच्या भेटीची इच्छाही अपूर्ण, एका चुकीने आयुष्य झाले उद्ध्वस्त
नेर : प्रेमप्रकरणात उद्ध्वस्त होऊन तुरुंगात गेलेल्या एका तरुणावर हातात बेड्या घालून आईच्या चितेला भडाग्नी देण्याची वेळ आली. नेर शहरात रविवारी या मुलाने आईवर अंत्यसंस्कार केले. मात्र अखेरच्या भेटीची आईची इच्छा मात्र त्याला पूर्ण करता आली नाही.
नेर येथील युवकाचे शेजारील एका तरुणीवर प्रेम जडले. दोघांनीही सोबत जगण्या-मरण्याच्या शपथा घेतल्या. आपल्या प्रेमाला विरोध होईल. कुटुंबीय मान्य करणार नाही म्हणून दोघेही घरुन पळून गेले. मात्र प्रेमात आकंठ बुडालेल्या या तरुणाला आपली प्रेयसी अल्पवयीन आहे, याचा विसर पडला. मुलीकडील मंडळींनी या दोघांचा शोध सुरू केला. दरम्यान, या प्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी या दोघांनाही जेरबंद केले. तरुणीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून त्या तरुणाविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला. सध्या तो यवतमाळच्या कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.
मुलगा तुरुंगात गेल्यावर त्याचा संपूर्ण परिवार हतबल झाला. एकुलत्या एक मुलाचे असे झाल्याने आईने हाय खाल्ली. रविवारी स्वयंपाक करताना स्टोव्हचा भडका झाला. त्यात त्या तरुणाची आई ६० टक्के जळाली. जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलाच्या भेटीसाठी ती काकुळतीने विनंती करीत होती. मात्र मुलगा तुरुंगात असल्याने तिच्या वेदना श्वासात गुदमरल्या. तिने अखेरचा श्वास घेतला.
मातेच्या चितेला भडाग्नी देण्यासाठी मुलाला तुरुंगातून सूट देण्यात आली. एखाद्या चित्रपटात शोभावे असे तो चार पोलिसांच्या सोबत गावात आला. हातात हातकड्या बांधूनच आईचे अंत्यदर्शन घेतले आणि हातकडी घालूनच आईच्या चितेला भडाग्नी दिली. हा प्रसंग पाहनू अनेक जण हेलावले. क्षणिक सुखासाठी माणसाचे जीवन कसे उद्ध्वस्त होते याचा प्रत्यय नेरच्या स्मशानभूमीत अनेकांनी अनुभवला. (तालुका प्रतिनिधी)