खैरी-नांदेपेरा मार्गाची दुरवस्था, बांधकामचे दुर्लक्ष
By Admin | Updated: July 18, 2015 02:17 IST2015-07-18T02:17:14+5:302015-07-18T02:17:14+5:30
राज्य मार्गावरील खैरी ते नांदेपेरा या दरम्यान ठिकठिकाणी रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

खैरी-नांदेपेरा मार्गाची दुरवस्था, बांधकामचे दुर्लक्ष
मार्डी : राज्य मार्गावरील खैरी ते नांदेपेरा या दरम्यान ठिकठिकाणी रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
सार्वजनिक बांधकाम उपविभाग मारेगावअंतर्गत या मार्गाची देखभाल, दुरूस्ती करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रस्तावित कामेसुद्धा सुरू करण्यास उदासिनता दिसून येत आहे. यामुळे प्रवासी, वाहन चालकांना मात्र मनस्ताप सहन करावा लागत आहे. बांधकाम उपविभाग वणीअंतर्गत वणी ते नांदेपेरा दरम्यान आठ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे रूंदीकरण, नुतनीकरण झाले आहे. जनतेच्या माहितीसाठी लावण्यात आलेल्या फलकावर मात्र १० किलोमीटर लांबीचा मार्ग दाखविण्यात आला आहे. त्यामुळे हा मार्ग नांदेपेरापर्यंत दुरूस्त होवू शकला नाही. तो अर्धवट मार्ग पूर्ण होणे अपेक्षित आहे.
नांदेपेरा गावापुढे मारेगाव उपविभागाची हद्द सुरू होते. त्यापुढे मार्डी-दापोरा-खैरी दरम्यान काही टप्पे वगळता रस्त्याची एवढी दुरवस्था झाली, की, वाहन चालकांना खड्डे टाळणे अशक्य झाले आहे. या मार्गे अवजड वाहतूक करणारे ट्रक, एस.टी., आॅटो या सर्व वाहन चालकांना तसेच दुचाकी चालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. त्यातच रस्त्यांच्या दुतर्फा असलेली काटेरी झुडूपे, फांद्या रस्त्यावर आल्यामुळे वाहन चालकांना वाहन ओलांडताना काटेरी फांद्यामुळे ईजा, दुखापत होते. यावर बांधकाम विभागाकडून उपाययोजना होणे आवश्यक आहे. दापोरा ते खैरी दरम्यान ही समस्या मोठ्या प्रमाणावर आढळते.
चिंचमंडळ येथील नाल्यावर एक महिन्यापूर्वी आलेल्या पुराच्या पाण्यामुळे काटेरी कचरा, झुडूपे पाईपमध्ये अडकलेली आहे. त्याचीही विल्हेवाट लावण्यास दुर्लक्ष होत आहे. प्रवासी आणि वाहन चालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने झाडा-झुडुपांच्या फांद्या तोडणे, खड्डे आहेत तेथे तात्पुरती दुरूस्ती करून काहिसा दिलासा द्यावा व या मार्गाचे रूंदीकरण व डांबरीकरण नव्याने व्हावे, अशी जनतेची मागणी आहे. राळेगाव बांधकाम उपविभागाअंतर्गत राळेगाव ते खैरी टप्पा सुव्यवस्थित आहे. मात्र मारेगाव उपविभाग या कामात माघारलेला दिसून येत आहे. (वार्ताहर)