ग्रामपंचायत क्षेत्रात अवैध बांधकामांचा सपाटा

By Admin | Updated: December 30, 2014 23:45 IST2014-12-30T23:45:53+5:302014-12-30T23:45:53+5:30

शहरालगतच्या ग्रामपंचायत हद्दीत गेल्या काही दिवसांपासून विना परवानगी घर बांधकाम करण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. कोणतीही परवानगी न घेता नियमांची पायमल्ली करीत बांधकाम सुरू आहे.

Illegal construction works in the Gram Panchayat area | ग्रामपंचायत क्षेत्रात अवैध बांधकामांचा सपाटा

ग्रामपंचायत क्षेत्रात अवैध बांधकामांचा सपाटा

पुसद : शहरालगतच्या ग्रामपंचायत हद्दीत गेल्या काही दिवसांपासून विना परवानगी घर बांधकाम करण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. कोणतीही परवानगी न घेता नियमांची पायमल्ली करीत बांधकाम सुरू आहे. यातून ग्रामपंचायतीचा हजारो रुपयांचा महसूल बुडत आहे. मात्र राजरोस होणारे अवैध बांधकाम रोखण्यासाठी ग्रामपंचायतीजवळ यंत्रणाच नाही.
पुसद शहरालगत काकडदाती, कवडीपूर, श्रीरामपूर, धनकेश्वर, गायमुखनगर, बोरगडी, निंबी, लक्ष्मीनगर आदी ग्रामपंचायती आहेत. पुसद शहर आणि या ग्रामपंचायतींची सीमारेषा आता पुसट होत चालली आहे. पुसद शहरात वाढते भाव लक्षात घेता आणि जागेची उपलब्धतता असल्याने अनेक जण ग्रामपंचायत क्षेत्रात घर बांधत आहे.
त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून श्रीरामपूर, काकडदाती, गायमुखनगर, लक्ष्मीनगर या क्षेत्रात बांधकाम व्यवसाय फोफावला आहे. बांधकामासाठी प्रथम ग्रामपंचायतीची परवानगी घेणे आवश्यक असते. गृहकर्ज घेण्यासाठी ही परवानगी घेतली जाते. मात्र प्रथम चरणातील बांधकाम झाल्यानंतर पुढे होणाऱ्या अतिरिक्त बांधकामासाठी ग्रामपंचायतीकडून कोणतीही परवानगी घेतली जात नाही. प्लान इस्टीमेटमध्ये मंजूर बांधकामापेक्षा कितीतरी अधिक बांधकाम केले जात आहे.
शहरालगतच्या बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये चौरसफुटामध्ये बांधकामाच्या परवानगीसाठी रक्कम आकारली जाते. ही रक्कम साधारणत: ५०० रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंत असते. मात्र अतिरिक्त बांधकाम विना परवानगीने होत असल्याने ग्रामपंचायतीचा हजारो रुपयांचा महसूल बुडत आहे.
विशेष म्हणजे विना परवानगी ने होणाऱ्या या अवैध बांधकामावर लक्ष ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीकडे कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही. प्लॉटमध्ये कोणतेही बांधकाम करायचे झाल्यास नियमानुसार परवानगी घेणे गरजेचे असते. सरपंच, सदस्य यांच्याशी असलेल्या हितसंबंधामुळे या नियमांना हरताळ फासला जात आहे. त्यामुळे घरावर दुसरा मजला चढविताना तो अवैधपणे बांधल्या जातो.
तसेच ग्रामपंचायत क्षेत्रात करण्यात येणाऱ्या तात्पुरत्या बांधकामासाठी अशाप्रकारची परवानगी घेण्यात येत नाही. त्यातूनच अतिक्रमणासारखे प्रकार वाढले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Illegal construction works in the Gram Panchayat area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.