कारवाईत अडथळे : वणीतूनच दिली जाते तस्करांना टिपलोकमत न्यूज नेटवर्कवणी : नागपूर ते अदिलाबाद व्हाया वणी या मार्गे मोठ्या प्रमाणावर जनावरांची तस्करी सुरू असून तस्करीविरुद्ध कारवाई करणाऱ्या पोलिसांच्या हालचाली टिपून त्या तस्करांपर्यंत पोहचविण्याचे काम वणीतीलच काही असामाजिक तत्व करीत असल्याची गोपनिय माहिती पोलिसांकडे आहे. हे घरभेदे सध्या पोलिसांच्या रडावर आहेत. एकीकडे जीव धोक्यात घालून स्थानिक पोलीस यंत्रणा तस्करांविरुद्ध कारवाई करीत असली तरी काही अमाजिक तत्वांचे थेट जनावर तस्करांशी असलेले संबंध पोलिसांच्या कारवाईत अडथळा निर्माण करीत आहेत. वणी मार्गे तेलंगाणात जाणारे जनावरांचे ट्रक पकडण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने व ठाणेदार मुकूंद कुळकर्णी यांची पथके जीवाचे रान करीत आहेत. गोपनिय माहिती मिळताच, तातडीने कारवाईदेखील केली जात आहे. मात्र नागपुरातील तस्करांनी काही भाडोत्री ‘हेर’ वणीत पेरले असून त्यांच्याकडून तस्करांना पोलिसांच्या हालचाली कळविल्या जात आहेत. नागपुरातून दररोज तेलंगाणात ट्रकद्वारे शेकडो जनावरे कत्तलीसाठी नेली जात आहेत. एकाचवेळी पाच ते सहा ट्रक नागपुरातून काढले जातात. वरोरा तालुक्यातील नागपूर मार्गावर असलेल्या खांबाडापर्यंत हे ट्रक एकत्रित येतात. मात्र तेथून पुढे दोन-दोनच्या संख्येने वेळेचे अंतर ठेवून ट्रक वणीकडे येतात. तत्पूर्वी वरोरा व घुग्घूस येथील चेकपोस्टवर तस्करांचे हेर थांबून असतात. या चेकपोस्टवरील पोलिसांच्या हालचालीवर हे हेर लक्ष ठेऊन असतात. संधी मिळताच, मग हे चेकपोस्ट पार करून वणीकडे कूच करतात. नागपुरातील तस्करांनी वणीतही आपले हेर फेरून ठेवले आहेत. ज्या दिवशी नागपुरातून ट्रक निघतात, त्या दिवशी वरोरा व घुग्घूस मार्गावर हे हेर फिरत असतात. त्यातील एका हेराकडे पांढऱ्या रंगाची कार असून अन्य दोघांजवळ मोटारसायकल आहेत. पोलिसांच्या हालचाली कळताच, त्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या चालकाला ‘टीप’ दिली जाते. वणीतील पोलीस सतर्क असल्याचे लक्षात येताच, ट्रक चालक मग आपला मार्ग बदलविण्याचा प्रयत्न करतात. गेल्या महिन्याभरात ट्रक चालक व पोलीस यांच्या अनेकदा संघर्ष झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे कारवाईत आडकाठी आणणारे तस्करांचे स्थानिक हेर सध्या वणी पोलिसांच्या रडारवर आहेत. जनावरांची तस्करी रोखताना या हेरांवरदेखील वणी पोलीस पाळत ठेऊन आहेत. लवकरच या हेरांना जेरबंद केले जाईल, असा पोलिसांना विश्वास आहे. वरोरा, घुग्घूस पोलिसांचे असहकार्यनागपूरपासून वणीपर्यंत अनेक पोलीस ठाणी, चेकपोस्ट लागतात. मात्र तेथून हे तस्करीचे ट्रक वणीपर्यंत येतातच कसे, असा प्रश्न साऱ्यांनाच अस्वस्थ करीत आहेत. नागपूरवरून वणीकडे येताना चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर वरोरा आणि घुग्घूस अशी दोन पोलीस ठाणी आहेत. असे असताना ही दोन ठाणी पार करून हे ट्रक वणीपर्यंत सहजरित्या पोहचत असल्याने वरोरा व घुग्घूस पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लावले जात आहे. जनावरांच्या तस्करीबाबत वणी पोलीस जेवढे सतर्क आहेत, तेवढी सतर्कता वरोरा व घुग्घूस पोलिसांकडून का बाळगली जात नाही, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. अनेकदा या दोन पोलीस ठाण्यांना वणी पोलिसांकडून तस्करीची माहिती दिली जाते. मात्र अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची माहिती आहे.
जनावर तस्करीतील घरभेदे रडारवर
By admin | Updated: June 5, 2017 01:25 IST