अत्यल्प प्रवास भत्त्याचा केंद्र प्रमुखांना भुर्दंड
By Admin | Updated: February 5, 2015 23:16 IST2015-02-05T23:16:50+5:302015-02-05T23:16:50+5:30
जिल्हा परिषद शिक्षण विभागात १९९५ मध्ये केंद्र प्रमुख पदाची निर्मिती करण्यात आली. केंद्रातील शाळांना गाठीभेटी, वर्गनिरीक्षण, मार्गदर्शन तासिका, गुणवत्ता विकास उपक्रम,

अत्यल्प प्रवास भत्त्याचा केंद्र प्रमुखांना भुर्दंड
नेर : जिल्हा परिषद शिक्षण विभागात १९९५ मध्ये केंद्र प्रमुख पदाची निर्मिती करण्यात आली. केंद्रातील शाळांना गाठीभेटी, वर्गनिरीक्षण, मार्गदर्शन तासिका, गुणवत्ता विकास उपक्रम, शाळेचे रेकॉर्ड नियंत्रण अशा प्रमुख जबाबदाऱ्या केंद्र प्रमुखाकडे सोपविण्यात आल्या. यासाठी केंद्र प्रमुखाला प्रवास भत्ता लागू करण्यात आला. मात्र त्यावेळी मंजूर केलेले २०० रुपये प्रवास भत्ता आजही कायम आहे. वाढत्या महागाईत हे केंद्र प्रमुखांना शक्य होत नाही.
केंद्र प्रमुखाकडे इयत्ता नववी ते अकरावीपर्यंत शाळांचा समावेश असतो. प्रत्येक शाळांना आठवड्यातून दोनदा भेटी देण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. महिनाभराचा विचार केल्यास केंद्र प्रमुखाला २० दिवस प्रवास करावा लागतो. या मोबदल्यात त्यांना केवळ २०० रुपये प्रवास भत्ता मिळतो. या तुलनेत राज्य शासनातील इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांना भरपूर असा प्रवासी भत्ता दिला जातो. मात्र केंद्र प्रमुखाच्या वाट्यालाच उपेक्षा आली आहे. केंद्र प्रमुख संघटनेने प्रवास भत्ता वाढविण्याची मागणी लावून धरली होती. मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.
शाळांना भेटी देणे, गुणवत्ता विकास मार्गदर्शन, विविध उपक्रमांची अंमलबजावणी, विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करणे इत्यादी जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. शाळा ते पंचायत समिती असा प्रवास केंद्र प्रमुखाला करावा लागतो. या उपरही वरिष्ठांकडून नोटीस बजावली जाते. प्रवास भत्ता अत्यल्प असल्याने केंद्र प्रमुखांनाच आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.
कागदपत्रांची पूर्तता करतानाच वरिष्ठांचे बोलणे खावे लागते. त्यामुळे केंद्र प्रमुख त्रस्त आहे. या शिवाय तालुक्यातील राजकीय व्यक्तींकडून केंद्र प्रमुखाकडे विविध कार्यक्रमांसाठी वर्गणी मागितली जाते. वर्गणी दिली नाही तर कारवाईचा धाक दाखविला जातो.
केंद्र प्रमुख हा पंचायत समिती शिक्षण विभाग आणि शाळा यात समन्वय साधणारा घटक आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याचीच उपेक्षा होत आहे. केंद्र प्रमुखाच्या प्रवास भत्त्यात लवकरात लवकर वाढ करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)