पाण्यासाठी पालकमंत्री, खासदारांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 23:11 IST2018-03-10T23:11:59+5:302018-03-10T23:11:59+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी पालकमंत्री पाणीटंचाईचा आढावा घेत असताना बाहेर पाण्याच्या प्रतीक्षेतील नागरिक त्यांना घेराव करण्यासाठी सज्ज होते. बैठकीतून पालकमंत्री आणि खासदार बाहेर पडताच त्यांना नागरिकांनी घेराव घातला.

पाण्यासाठी पालकमंत्री, खासदारांना घेराव
ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी पालकमंत्री पाणीटंचाईचा आढावा घेत असताना बाहेर पाण्याच्या प्रतीक्षेतील नागरिक त्यांना घेराव करण्यासाठी सज्ज होते. बैठकीतून पालकमंत्री आणि खासदार बाहेर पडताच त्यांना नागरिकांनी घेराव घातला.
शहरातील भाग्योदय सोसायटीमध्ये गत २८ दिवसांपासून पाणी आले नाही. यामुळे या भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. काही भागात दररोज नळ येत आहे. मात्र आम्हाला पाण्याचा थेंब मिळत नाही, असे का घडते, असा संतप्त सवाल या भागातील महिलांनी पालकमंत्री मदन येरावार आणि खासदार भावना गवळी यांना केला. यासाठी नागरिक व महिलांनी तब्बल दोन तास सभागृहाबाहेर ठिय्या दिला होता.
यावेळी महिलांनी जीवन प्राधिकरणाचे अधिकारी उद्धट उत्तर देतात, असा गंभीर आरोप केला. पालकमंत्र्यांनी लगेच जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता अजय बेले यांना बोलावून पाण्याचे ठोस नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी खासदार भावना गवळी यांनी पाण्याची हमी मी घेते, असे म्हणत त्या गराड्यातून स्वत:ची सुटका करवून घेतली. पालकमंत्री मदन येरावार यांनी महिलांची समस्या लक्षात घेऊन प्राधिकरणाला विविध सूचना केल्या. पालकमंत्र्यांनी बैठकीचा वृत्तांत महिलांना सांगितला.