ग्रामपंचायत सदस्य, दंत तंत्रज्ञ एसीबीच्या जाळ्यात
By Admin | Updated: November 8, 2014 01:41 IST2014-11-08T01:41:46+5:302014-11-08T01:41:46+5:30
ग्रामपंचायत सदस्य आणि आरोग्य विभागातील दंत तंत्रज्ञास शुक्रवारी अनुक्रमे दहा हजार आणि एक हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.

ग्रामपंचायत सदस्य, दंत तंत्रज्ञ एसीबीच्या जाळ्यात
यवतमाळ : ग्रामपंचायत सदस्य आणि आरोग्य विभागातील दंत तंत्रज्ञास शुक्रवारी अनुक्रमे दहा हजार आणि एक हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे येथील पोलीस उपअधीक्षक सतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. रामकृष्ण भुजंगा धनगर (५५) असे या ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. दिग्रस तालुक्यातील फेट्री ग्रामपंचायतमध्ये ते सदस्य तथा लोकसेवक आहेत. गावातील अंगणवाडीचे बांधकाम सुरळीत चालू ठेवणे, या बांधकामाबाबत पुढे तक्रारी न करणे आणि केलेली तक्रार मागे घेणे यासाठी रामकृष्ण धनगर यांनी तक्रारकर्त्याला दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. शुक्रवारी दिग्रसमधील मानोरा चौकात बाजोरिया यांच्या हॉटेलमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला आणि तेथेच रामकृष्ण धनगर यांना दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले.
एसीबीने लाचेची अशीच एक कारवाई यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दंत तंत्रज्ञ संजय बापूराव फेदुजवार (४४) यांच्यावर केली. त्यांना एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले. कृत्रिम दात तयार करून बसवून देण्यासाठी संजय यांनी रुग्णाला एक रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम स्वीकारताना त्यांना शासकीय रुग्णालयाच्या आवारातच पकडण्यात आले.
उपरोक्त कारवाई उपअधीक्षक सतीश देशमुख, पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, नंदकुमार जामकर, कर्मचारी अरुण गिरी, प्रकाश शेंडे, गजानन राठोड, शैलेश ढोणे, अमित जोशी, अनिल राजूरकर, विशाल धलवार, अमोल महल्ले, निलेश पखाले, सुधाकर मेश्राम, भारत चिरडे, किरण खेडकर, नरेंद्र इंगोले यांनी केली. (प्रतिनिधी)