पोषण आहारात गौडबंगाल
By Admin | Updated: October 14, 2014 23:24 IST2014-10-14T23:24:46+5:302014-10-14T23:24:46+5:30
अंगणवाडीच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात मोठ्या प्रमाणात गौडबंगाल होत असून १०० टक्के उपस्थिती असल्याचा देखावा निर्माण केला जातो. खरेच प्रत्येक अंगणवाडीत १०० टक्के उपस्थिती

पोषण आहारात गौडबंगाल
रितेश पुरोहित - महागाव
अंगणवाडीच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात मोठ्या प्रमाणात गौडबंगाल होत असून १०० टक्के उपस्थिती असल्याचा देखावा निर्माण केला जातो. खरेच प्रत्येक अंगणवाडीत १०० टक्के उपस्थिती असते काय हा संशोधनाचा विषय महागाव तालुक्यात झाला आहे.
कुपोषणावर मात करण्यासाठी अंगणवाडीच्या माध्यमातून पोषण आहार राबविला जातो. महागाव तालुक्यात १६९ अंगणवाड्या आहेत. दररोज बालकांना एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभागाच्या माध्यमातून पोषण आहार पुरविला जातो. त्यावर निरीक्षकांचे नियंत्रण असते. मात्र महागाव तालुक्यात असे कोणतेही नियंत्रण दिसत नाही. त्यामुळे पोषण आहार वितरणात मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात अंगणवाडीवरील कार्यरत सेविकांच्या माध्यमातून पोषण आहार दिला जातो. पोषण आहार योग्य पद्धतीने तयार करून ठरलेल्या मोजमापाप्रमाणे बालकांना द्यावा, असा दंडक आहे. नेमका मोजमापाप्रमाणे पोषण आहार दिला जातो की नाही हे पाहण्याची जबाबदारी वरिष्ठांकडे आहे. परंतु याकडे कुणाचेही लक्ष नाही. केवळ कागदोपत्रीच पोषण आहार दिसत आहे. महागाव तालुक्यात कुपोषणाचे प्रमाण अलिकडे वाढत असल्याचे दिसत आहे.
यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे १६९ अंगणवाड्यांमध्ये १०० टक्के उपस्थिती दाखविले जाते. नेमके किती विद्यार्थी असतात हे सर्व गावकऱ्यांना माहीत आहे. परंतु १०० टक्के उपस्थिती दाखवून गैरहजर विद्यार्थ्यांचा पोषण आहार हडपला जात आहे. मोठ्या प्रमाणात पोषण आहार शिल्लक असतो. मात्र कागदोपत्री उपस्थिती दाखवून पोषण आहार उचलला जात आहे. बहुतांश अंगणवाडीतील पोषण आहार काळ्याबाजारात विकला जातो. या सर्व प्रकाराच्या तक्रारी देऊनही अद्यापपर्यंत कुणावर कारवाई झाली नाही.