वनीकरणाच्या नावावर शासकीय यंत्रणांनी हडपला कोट्यवधींचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 11:15 IST2025-04-08T11:13:22+5:302025-04-08T11:15:14+5:30

झाडे सोडा, खड्डेही सापडेना : म्हणे, यंदा लावली तीन लाख ९४ हजार झाडे

Government agencies have grabbed crores of rupees in the name of afforestation. | वनीकरणाच्या नावावर शासकीय यंत्रणांनी हडपला कोट्यवधींचा निधी

Government agencies have grabbed crores of rupees in the name of afforestation.

विशाल सोनटक्के 
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ :
वनसंपदेने नटलेल्या यवतमाळ जिल्ह्याला वनविभागातीलच खाबुगिरीची नजर लागली आहे. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील उघडे जंगल क्षेत्र २२५ स्क्वेअर किलोमीटरने घटले आहे. या अहवालानंतर वनविभागाने यंदा केलेल्या जिल्ह्यातील वृक्षारोपणाची माहिती घेतली असता यावर्षी लावलेल्या तीन लाख ९४ हजार झाडांचा थांगपत्ता लागला नाही. झाडे तर सोडा अनेक ठिकाणी वनविभागाने खोदलेले खड्डेही आढळले नाहीत.


जिल्ह्यात वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, अलीकडील काळात वाढते वणवे, अतिक्रमणांचा विळखा आणि वनविभागाच्या उदासीनतेमुळे जंगल क्षेत्रात मोठी घट होत आहे. यंदाच्या अहवालानुसार यवतमाळ जिल्ह्यातील उघडे वनक्षेत्र २०२१ मध्ये १३२१.०२ स्क्वेअर किलोमीटर होते. २०२४ मध्ये यात घट होऊन ते १०९७.८७ स्क्वेअर किलोमीटरवर आले आहे. वनीकरण विभागाकडून दरवर्षी वृक्षलागवडीवर कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या हरितीकरण तसेच वनमहोत्सवावरही लाखोंची उधळण होते. मध्यवर्ती रोपवाटिकांच्या आधुनिकीकरण व बळकटीकरणासाठी सामाजिक वनीकरण विभागाला भरीव निधी दिला जातो. सोबत पानथळे, सरोवरे आदी ठिकाणच्या जैवविविधतेच्या व्यवस्थापनासाठी निधीचे वाटप होते. मनरेगा, तसेच राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतूनही वृक्षलागवडीचा कार्यक्रम दरवर्षी राबविला जात असताना जंगल क्षेत्रात होत असलेली घट चिंताजनक आहे.


या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यात विविध शासकीय यंत्रणांच्या वतीने यंदा केलेल्या वृक्षारोपणाचा आढावा घेतला असता बहुतांश ठिकाणी लावलेली रोपे तर सोडा, वनविभागाने खोदलेले खड्डेही आढळून आले नाहीत. 


हजारो झाडे गेली कुठे ?
वनीकरण विभागासह विविध यंत्रणांच्या वतीने जुलै २०२४ मध्ये तब्बल तीन लाख ९४ हजार ८४७ रोपे लावल्याचे सांगितले जाते. यामध्ये पुसद विभागात सत्तरमाळ भाग १ आणि २ येथे प्रत्येकी ८,८८८ रोपे लावली आहेत. भाग ३ मध्ये २२,२२० तर भाग ४ येथे १८ हजार रोपांची लागवड केल्याचे सांगितले जाते. यवतमाळ विभागातील चिचबर्डी येथे सर्व्हे क्र. ४७१ मध्ये २२,२२० रोपे, तर पुसद विभागातील रोहणा दिग्रस येथे सर्व्हे क्र. ७७४ मध्ये तीन भागांत तब्बल ६१,८७३ झाडे लावल्याचे रेकॉर्ड आहे. यवतमाळ विभागातील सावंगी राऊत येथेही ११,११० रोपे लावल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात चिचबर्डी, रोहणा दिग्रस, तसेच सावंगी राऊत येथे संबंधित सर्व्हे क्रमांकावर झाडेच नसल्याचा प्रकार आढळून आला.


...म्हणे, वृक्षारोपण कार्यक्रम ठरावीक काळापुरता
विविध यंत्रणांच्या वतीने केलेल्या वृक्षलागवडीच्या कार्यक्रमस्थळी आज झाडे दिसून येत नाहीत. याबाबत सामाजिक वनीकरण विभागाच्या जिल्हा वनीकरण अधिकारी प्रणिता पारधी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही वेळा त्या कार्यालयात उपलब्ध नव्हत्या. तेथे उपस्थित वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर मडावी यांना विचारले असता, तीन वर्षापासून आमच्या विभागाकडून वनीकरण झाले नसल्याचे ते म्हणाले. वनीकरण विभागातर्फे यापूर्वी वृक्षलागवडच्या ठिकाणीही आज झाडे नसल्याचे सांगितले असता वनीकरणाचा कार्यक्रम ठराविक कालावधीपुरता असतो, असे अजब उत्तर मडावी यांनी दिले.

Web Title: Government agencies have grabbed crores of rupees in the name of afforestation.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.