गोरगरिबांचे धान्य बेपत्ता
By Admin | Updated: October 11, 2014 02:19 IST2014-10-11T02:19:11+5:302014-10-11T02:19:11+5:30
धान्य घोटाळ्याने प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या महागाव तालुक्यातील धान्य वितरण व्यवस्था अद्यापही सुधरायला तयार नाही.

गोरगरिबांचे धान्य बेपत्ता
महागाव : धान्य घोटाळ्याने प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या महागाव तालुक्यातील धान्य वितरण व्यवस्था अद्यापही सुधरायला तयार नाही. सणासुदीच्या काळात गोरगरिबांचे धान्य बेपत्ता झाले असून उमरखेड आणि पुसद तालुक्यातील दुकानांना जोडलेल्या गावांमध्ये तर कधी धान्य वितरण होते हा संशोधनाचा विषय आहे. सणासुदीच्या काळात तर सोडा नियमितही महागाव तालुक्यातून साखर हद्दपार झाल्याचे दिसून येते. या प्रकारावर कुणाचाही अंकुश नसल्याने गोरगरीब धान्यापासून वंचित राहात आहे.
महागाव तालुक्यात २९ हजार राशन कार्डधारक आहे. ११६ दुकानांमधून स्वस्त धान्याचे वितरण केले जायचे. बीपीएल, एपीएल आणि अंत्योदय योजनेंतर्गत गहू, तांदूळ, साखर व इतर साहित्य वितरित होत होते. परंतु महागाव तालुक्यात २०११-१२ मध्ये १ कोटी ५८ लाख रुपयांचा धान्य घोटाळा उघडकीस आला. अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले तर ९२ दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले. त्यानंतर रद्द झालेली दुकाने उमरखेड आणि पुसद तालुक्यातील दुकानदारांना जोडण्यात आले. या दुकानदारांनी गावात आणून धान्य वितरण करावे, असा दंडक घालून देण्यात आला. परंतु थोडेफार धान्य गावात पाठवायचे आणि इतर धान्य काळ्या बाजारात विकायचे असाच प्रकार गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. नेमके धान्य वितरणासाठी कधी येते आणि कोण वितरित करतो हेही कळत नाही. विशेष म्हणजे धान्य वितरणासाठी आल्यानंतर ग्रामपंचायतला सूचना देऊन दवंडी देणे गरजेचे आहे. मात्र असा कोणताही प्रकार होत नाही. दुपारच्या वेळी मजूर आणि शेतकरी शेतात गेल्यानंतर स्वस्त धान्य दुकानदार धान्य घेऊन येतात आणि वितरण केल्याचा देखावा करतात. विशेष म्हणजे उमरखेड आणि पुसद तालुक्यातील काही दुकानदारांनी तर आपले डमी वितरक नेमल्याची माहिती आहे.
याबाबत अनेकांनी तहसीलदारांकडे तक्रारी केल्या. परंतु कोणतीही उपाययोजना झाली नाही. याबाबत तहसील प्रशासनाशी संपर्क साधला असता ग्रामपंचायती किंंवा सोसायट्यांनी ठराव दिल्यास त्यांना धान्य वितरणाची परवानगी मिळू शकते. परंतु यासाठी कुणी पुढे येत नसल्याचे सांगण्यात आले. तहसील प्रशासनाने नवीन धान्य दुकानासाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठी शासनाकडे परवानगी मागितली. मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे कारण पुढे करीत परवानगी नाकारली. त्यामुळे बाहेर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांवरच अवलंबून राहावे लागत आहे आणि ते नियमितपणे धान्याचे वितरण करीत नसल्याचा अनुभव आहे. महागाव तालुक्यातील गोरगरिबांना साखर तर कधी पहायला मिळाली नाही. धान्य येते परंतु साखर हद्दपार झाल्याचे दिसत आहे. या सर्व प्रकाराचा परिणाम मात्र गोरगरिबांवर होत आहे. (तालुका प्रतिनिधी)