मजुरांच्या खात्यातील काळ्या पैशांच्या हेराफेरीत चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 12:55 IST2025-07-19T12:55:03+5:302025-07-19T12:55:43+5:30

Yavatmal : विशेष पथकाची कारवाई

Four arrested in black money fraud in laborers' accounts | मजुरांच्या खात्यातील काळ्या पैशांच्या हेराफेरीत चौघांना अटक

Four arrested in black money fraud in laborers' accounts

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ :
रोजगार हमी योजनेचा लाभ देतो, असे सांगून पांढरकवडा तालुक्यातील चार गावांतील मजुरांच्या नावाने बँक ऑफ महाराष्ट्र येथे खाते उघडण्यात आले. या खात्यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल मार्च ते जून या कालावधीत करण्यात आली. या प्रकरणात प्राथमिक माहितीवरून पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला. एलसीबीच्या विशेष पथकाने तपास हाती घेतला असून, गुरुवारी रात्री चौघांना अटक केली.


मयुर राजेश चव्हाण (२०, रा. चोपण, ता. केळापूर, जि. यवतमाळ), अलताब अहेमद मो. अनीस अकबानी (२३, रा. तुकुंम तलावजवळ, चंद्रपूर), उमेश अनिल आडे (३१, रा. वसंतनगर, ता. केळापूर), निखिल यादव खैरे (३०, रा. उमरी रोड, ता. केळापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील उमेश व निखिल याने सुरुवातीला बँक खाते काढून ते काळ्या पैशांच्या उलाढालीसाठी वापरण्यास उपलब्ध करून दिले. नंतर मयूर चव्हाण हासुद्धा त्यांच्या संपर्कात आला. मयूरने चोपन, वाघोली, वसंतनगर, दहेली तांडा येथील मजुरांची कागदपत्र घेऊन पांढरकवडा शाखेत बँक खाते उघडले. हे सर्वजण चंद्रपूर येथील अलताब अहेमद मो. अनीस अकबानी याच्याशी जुळले होते. बँक खाते काढून देण्याच्या मोबदल्यात त्यांना एकूण उलाढालीच्या तीन टक्के रक्कम मिळत होती. या चौघांनी कोणत्या व्यक्तीसाठी हे खाते उघडून व्यवहार घडवून आणला, याचा शोध घेणे बाकी आहे.


कोट्यवधीच्या अपहारात एक पहिली कडी पोलिसांना जेमतेम मिळाली आहे. या अपहारामध्ये केवळ १५ खात्यांची पडताळणी केली असता सात कोटी ५३ लाखांची उलाढाल झाल्याचे पुढे आले आहे. विधिमंडळात हा मुद्दा केळापूरचे आमदार राजू तोडसाम यांनी लावून धरला. त्यानंतर पोलिसांच्या तपासाला गती मिळाली आहे. आमदारांनी विधिमंडळात तक्रार दाखल झालेले खरे आरोपी नाहीत, पोलिस अधिकारी, कर्मचारी, दलाल यांच्यासह मोठे नेटवर्क यामागे काम करीत असल्याचे सांगितले होते. त्यासाठी सखोल तपास करून गरिबांच्या खात्याचा काळ्या पैशांसाठी वापर करणारे मुख्य आरोपी उघड करावेत, अशीही मागणी आमदारांनी विधिमंडळात केली होती.


एलसीबीच्या पथकाचे सहायक निरीक्षक दत्ता पेडणेकर व त्यांचे सहकारी या प्रकरणाचा तपास करीत आहेत. अजूनही पोलिसांना हा काळा पैसा आला कोठून, याचे डिटेल्स मिळालेले नाहीत.

Web Title: Four arrested in black money fraud in laborers' accounts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.