उपचारासाठी माजी सैनिक कुटुंबाची फरपट

By Admin | Updated: September 11, 2015 02:54 IST2015-09-11T02:54:57+5:302015-09-11T02:54:57+5:30

जिल्ह्यातील सुमारे दोन हजार माजी सैनिक कुटुंबांची पॉलिक्लिनिक नसल्याने उपचारासाठी फरपट सुरू आहे.

Former military family scam for treatment | उपचारासाठी माजी सैनिक कुटुंबाची फरपट

उपचारासाठी माजी सैनिक कुटुंबाची फरपट

पॉलिक्लिनिक नाही : विदर्भात एकमेव यवतमाळ वंचित, दोन हजार कुटुंबांना फटका
यवतमाळ : जिल्ह्यातील सुमारे दोन हजार माजी सैनिक कुटुंबांची पॉलिक्लिनिक नसल्याने उपचारासाठी फरपट सुरू आहे. विदर्भात केवळ यवतमाळ या सुविधेपासून वंचित आहे. परिणामी या कुटुंबातील लोकांना उपचारासाठी खर्चाचा भार सहन करावा लागत आहे. ही सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी मागील काही वर्षांपासून ‘ईसीएचएस’ (माजी सैनिक अंशदायी स्वास्थ्य योजना समिती) कृती समितीचे प्रयत्न सुरू आहे. मात्र जिल्हा प्रशासनाकडून यात खोडा घातला जात असल्याचा आरोप होत आहे.
माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी शासनामार्फत अंशदायी स्वास्थ्य योजना राबविली जाते. यासाठी सेवानिवृत्तीच्या वेळी प्रत्येक माजी सैनिकाकडून १८ हजार रुपये कपात केले जाते. सोबतच पॉलिक्लिनिकमध्ये उपचारासाठी कार्ड देण्यात येते. ही सोयच यवतमाळात नाही. वर्धा-अमरावती-नागपूर आदी ठिकाणी जाऊन याचा लाभ घेतला जाऊ शकतो. मात्र साधारण आजारासाठी प्रवास आणि भाड्याचा खर्च परवडणारा नसल्याने हे कुटुंब स्थानिक डॉक्टरकडूनच औषधोपचार घेतात. पॉलिक्लिनिक असल्यास संंबंधित तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचार घेता येते. यासाठीचा खर्च माजी सैनिक अंशदायी स्वास्थ्य योजनेंतर्गत दिला जातो. येथे पॉलिक्लिनिक मंजूर झाले असले तरी जागा उपलब्ध झाली नाही. मागील चार वर्षांपासून अनेकदा जागा बदलविण्यात आल्या. कायमस्वरूपी जागेसाठी झालेल्या पाठपुराव्यानंतरही हा प्रश्न निकाली काढला गेला नाही. लोकप्रतिनिधींनीही यासंदर्भात संबंधितांना दिशानिर्देश दिले. तरीही प्रश्न कायम आहे. आता ईसीएचएस कृती समितीने संरक्षण मंत्र्यांना निवेदन पाठवून आंदोलनाचा इशारा दिला असल्याचे समितीचे जिल्हा संयोजक अजय पिसाळकर यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Former military family scam for treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.