११ गावात ‘आरओ’ला मंजुरी : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत माहिती लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्ह्यातील ७४ गावांमधील नागरिकांना अद्याप फ्लोराईडयुक्त पाणी प्राशन करावे लागत आहे. तेथील सर्व स्त्रोत बाधीत असल्याचे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सांगण्यात आले. जिल्ह्यातील ७४ गावांमधील पाण्याचे १११ स्त्रोत फ्लोराईडयुक्त आहे. त्यापैकी ज्या गावांत पाण्याचे दुसरे कोणतेही स्त्रोत उपलब्ध नाही, अशा गावांमध्ये आरओ बसविण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. आत्तापर्यंत ११ गावांमध्ये आरओ बसविण्यास मंजुरी देण्यात आली. उर्वरित गावांत निधी मिळताच आरओ बसविण्यास मंजुरी दिली जाणार आहे. दिग्रस तालुक्यातील कोळशी येथे फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे ३० ग्रामस्थांना किडणीच्या आजाराची लागण झाली आहे. मात्र या गावात अद्याप आरओ बसविण्यात आले नाही. जिल्ह्यात पावसाळ्याच्या तोंडावर पाणीटंचाई तीव्र झाली असून जिल्हा परिषदेने २० टँकर सुरू केले आहे. याशिवाय २५१ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. काही गावांमध्ये पाण्याचे शाश्वत स्त्रोत नसल्याने पाणीपुरवठा करताना अडचणी निर्माण होत आहे. सभेत दारव्हा तालुक्यातील खानापूर येथील कोल्हापुरी बंधाऱ्याला ३१ बरगे बसविल्याने ३० टीसीएम पाणीसाठा झाल्याचे सांगण्यात आले. मात्र सदस्यांनी त्यापैकी तीन बरगे लिकीज असल्याचे निदर्शनास आणून दिले. शिक्षणचा वेगळवेगळा न्याय का ? शिक्षक समायोजनात काही शिक्षकांवर अन्याय झाल्याचे शिवसेना सदस्याने सांगितले. तसेच शिक्षण विभाग दोन शिक्षकांना वेगवेगळा न्याय का लावत आहे, असा प्रश्न उपस्थित केला. कठाणे नामक शिक्षकाच्या शाळेत केवळ नऊ विद्यार्थिनी असताना त्यांनी मुलींच्या उपस्थिती भत्त्यात एक लाख सहा हजारांचा अपहार कसा केला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे दोन लाख ४४ हजार बाकी असून त्यांना खर्चाचे पुरावे मागितल्याचे सांगितले. दुसऱ्या घटनेत मंगी शाळेतील भोयर नामक शिक्षकाने विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण करूनही त्याच्याविरूद्ध कठोर कारवाई केली नसल्याचे सदस्याने स्पष्ट केले. पालकांची तक्रार नव्हती म्हणून शिक्षण विभाग चूप का बसला, असा प्रश्न त्यांनी केला. त्या शिक्षकाला बडतर्फ करण्याची मागणी त्यांनी केली. त्यावर बहुतांश सदस्यांनी बाक बाजवून त्यांचे समर्थन केले.
जिल्ह्यातील ७४ गावात फ्लोराईडयुक्त पाणी
By admin | Updated: June 7, 2017 00:48 IST