सचिन येडा टोळीतील पाच जणांना मोक्काअंतर्गत अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2022 05:00 IST2022-05-29T05:00:00+5:302022-05-29T05:00:29+5:30
सातत्याने गुन्हे करून दहशत निर्माण करणाऱ्या टोळीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनात मोक्काची कारवाई करण्याचे प्रस्तावित करण्यात आले.

सचिन येडा टोळीतील पाच जणांना मोक्काअंतर्गत अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी मोक्का व तडीपारीची कारवाई केली जात आहे. सचिन उर्फ येडा छगन राठोड याच्या टोळीविरोधात पोलिसांनी मोक्काचा प्रस्ताव दाखल केला. या प्रस्तावाला मान्यता मिळाली. त्यानंतर, दोषारोपपत्र तयार करण्यात आले. या टोळीतील पाचही आरोपींना अटक झाली आहे.
सचिन उर्फ येडा छगन राठोड (२५) रा.जामनकरनगर, शुभम सुभाष जोगदंड (२२) रा.पांढरी, यश साहेबराव राऊत (२०) रा.अप्सरा टॉकीजच्या मागे, रोहन गणेश इंगळे (१९) रा.जवळा ता.आर्णी, करण प्रेमदास पवार (२३) रा. जामनकरनगर, यवतमाळ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींंची नावे आहेत. सचिन येडा व त्याची टोळी सक्रिय असून, अनेक गंभीर गुन्हे त्यांनी केले आहे. आर्णी मार्गावर बोलेरो पिकअप वाहन अडवून २५ हजार हिसकावले होते, याशिवाय या टोळीने यापूर्वीही गंभीर गुन्हे केले आहेत.
सातत्याने गुन्हे करून दहशत निर्माण करणाऱ्या टोळीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनात मोक्काची कारवाई करण्याचे प्रस्तावित करण्यात आले. आर्णी ठाणेदार पितांबर जाधव व सहायक पोलीस निरीक्षक नागेश जायले यांनी मोक्काचा तपास करण्यासाठी अपर पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था यांच्याकडे परवानगी मागितली. त्यांनी परवानगी दिल्यानंतर तपास करण्यात आली.
दोषारोपपत्र तयार करून, अपर पोलीस महासंचालकांकडे मान्यतेला पाठविण्यात आले. २६ मे रोजी या दोषारोपपत्राला मान्यता मिळाली. त्यावरून पाचही आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये शिपाई दिनेश जाधव, पुरुषोत्तम जाधव यांनीही सहकार्य केले.
संघटित गुन्हेगारांमध्ये भरली धडकी
- गंभीर गुन्हे करणाऱ्या तीन टोळ्यांवर मोक्का कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, दोषारोपपत्राला मान्यता मिळाली आहे. अविनाश चव्हाण (उमरखेड) याच्या टोळीतील आठ सदस्य, अक्षय राठोड टोळीतील ११ सदस्य व आता सचिन येडाच्या टोळीतील पाच सदस्यांवर मोक्का कारवाई केली आहे. याशिवाय एमपीडीए, तडीपारीचीही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे संघटित गुन्हेगारांमध्ये धडकी भरली आहे.