पाच कोटींचा फ्रॉड! जिल्हा बँकेच्या जांब बाजार शाखेतील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 18:08 IST2025-02-20T18:07:44+5:302025-02-20T18:08:37+5:30

ऑडिट रिपोर्टची प्रतीक्षा : गुन्हे नोंदविले जाणार

Five crore fraud! Incident at Jamb Bazar branch of District Bank | पाच कोटींचा फ्रॉड! जिल्हा बँकेच्या जांब बाजार शाखेतील प्रकार

Five crore fraud! Incident at Jamb Bazar branch of District Bank

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ :
शेतकऱ्यांची बँक अशी ओळख असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध शाखेत अपहाराची मालिका सुरू आहे. आर्णी, महागाव, हिवरा संगम, दिग्रस येथील गैरव्यवहार आजही चर्चेत आहे. आता पुसद तालुक्यातील जांब बाजार शाखेत तब्बल पाच कोटींचा फ्रॉड झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. 


शासन शेतकऱ्यांना विविध योजनेतून अनुदान, मदत आणि नुकसानभरपाई देते. पुसद तालुक्यातील जांब बाजार मध्यवर्ती बँकेच्या शाखेत खाते असलेल्या शेतकऱ्यांनाही शासनाने अनुदान दिले. सदर रक्कम खात्यात जमा झाल्यानंतर ती शेतकऱ्यांना विड्रॉल करता येणे अपेक्षित होते. मात्र, या अनुदानावर अधिकारी, कर्मचाऱ्यांनीच डल्ला मारल्याचा प्रकार दोन महिन्यांपूर्वी समोर आला होता. त्यातून जिल्हा बँकेकडून या प्रकरणात शाखेची चौकशी करण्यात आली. त्यात पाच कोटींचा अपहार झाल्याचे प्रोसेडिंगवर घेण्यात आले आहे. 


ऑडिट रिपोर्ट प्राप्त होताच दोषींवर गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा मध्यवर्ती बँकेतील अपहार यापूर्वीच चव्हाट्यावर आले आहे. महागाव, हिवरा संगम येथील प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता. काही प्रकरणात निलंबनाची कारवाईदेखील झाली. आर्णी, दिग्रस येथेही अशाच प्रकारे गैरप्रकार करण्यात आले. दिग्रस येथे रिकव्हरी रक्कम भरून घेण्यापलीकडे कुठलीच ठोस कारवाई झाली नाही. दरम्यान, आता जांब बाजार शाखेतील गैरप्रकार उघड झाल्याने शेतकरी सभासदांसह ठेवीदारांमध्ये चिंता वाढली आहे. त्यामुळे काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे आहे.


३५० ग्रॅम दागिने लंपासमुळे खळबळ
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घाटंजी शाखेतील लॉकरमधून महिलेचे ३५० ग्रॅम सोने-चांदीचे दागिने गहाळ झाल्याचा प्रकारही समोर आला. या प्रकरणात तक्रार दाखल असून, चौकशी केली जात असल्याची माहिती घाटंजीचे ठाणेदार निलेश सुरडकर यांनी दिली. या प्रकारामुळे लॉकरमध्ये दागिने ठेवलेल्या ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे.


अनुदानाची रक्कम संचालकाच्या वडिलांच्या कर्जात वळती
पुसद तालुक्यातील जांब बाजार शाखेने शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम चक्क संचालकाच्या वडिलांच्या वाहन कर्जात वळती केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. जिल्हा बँकेत झालेल्या बैठकीत यावर काही संचालकांनी आवाजही उठवला. त्यानंतर ही बाब प्रोसेडिंगवर घेण्यात आली. एकूणच या सर्व प्रकारामुळे जिल्हा बँकेचा कारभार नियंत्रणाबाहेर गेल्याचे दिसत आहे.


५ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे चौकशीत उघड
जांब बाजार शाखेतील व्यवहार तपासण्यासाठी लेखा परीक्षण करण्यात येणार आहे. या अहवालानंतर अपहार नेमका कितीचा हे समोर येईल. जिल्हा बँक
नेहमीच चर्चेत असते. यापूर्वी अध्यक्षांवरील अविश्वास प्रस्तावावरून बँकेतील राजकारण तापले होते. आता घाटंजी, जांबबाजार येथील प्रकरण चर्चेत आले.


"जांब बाजार शाखेत पाच कोटींचा अपहार झाल्याचे प्राथमिक चौकशी अहवालातून पुढे आले आहे. त्या अनुषंगाने चौकशी केली जात आहे. ऑडीट रिपोर्टनंतर सत्यता समोर येईल."
- मनीष पाटील, अध्यक्ष, जिल्हा बँक, यवतमाळ

Web Title: Five crore fraud! Incident at Jamb Bazar branch of District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.