साडेपाच हजार युवक रोज जाताहेत तंबाखूच्या आहारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 07:00 IST2020-05-29T07:00:00+5:302020-05-29T07:00:02+5:30
एकीकडे कोरोनामुळे सारा देश त्रस्त आहे. तर दुसरीकडे गेल्या कित्येक वर्षांपासून तंबाखूमुळे होणारे मृत्यू कोरोनापेक्षाही भयंकर असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे. गुरुवारी शिक्षण विभागाच्या माध्यमातून देशभरातील तज्ज्ञांनी याबाबत ऑनलाईन मंथन केले.

साडेपाच हजार युवक रोज जाताहेत तंबाखूच्या आहारी
अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : एकीकडे कोरोनामुळे सारा देश त्रस्त आहे. तर दुसरीकडे गेल्या कित्येक वर्षांपासून तंबाखूमुळे होणारे मृत्यू कोरोनापेक्षाही भयंकर असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे. गुरुवारी शिक्षण विभागाच्या माध्यमातून देशभरातील तज्ज्ञांनी याबाबत ऑनलाईन मंथन केले. देशात दरदिवशी ५ हजार ५०० युवक पहिल्यांदा तंबाखूची चव चाखत असल्याची बाब या विचारमंथनात नोंदविण्यात आली.
जीवघेण्या तंबाखूच्या व्यसनात अडकणाऱ्या युवकांची संख्या दररोज वाढत असल्याची आकडेवारी यावेळी समोर आली. तर त्याचवेळी केवळ तंबाखू सेवनाने देशात दरदिवशी ३ हजार ५०० लोक मृत्युमुखी पडत असल्याची गंभीर बाबही यावेळी पुढे आली. राज्याच्या शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, सलाम मुंंबई फाऊंडेशन आणि द युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने हा राष्ट्रीय स्तरावरील वेबिनार आयोजित करण्यात आला होता. तंबाखू कंपन्या निकोटीन उत्पादनांकडे तरुणांना आकर्षित करण्यासाठी हेतूपूर्वक आक्रमक रणनीती अवलंबत आहे. लहान वयातच मुलांना तंबाखूजन्य पदार्थांची सवय लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे गंभीर मुद्दे यावेळी पुढे आले.
महाराष्ट्र सरकार आणि सलाम मुंबई फाऊंडेशनच्या माध्यमातून ‘तंबाखूमुक्त शाळा’ उपक्रम राबविला जात आहे. त्याद्वारे आतापर्यंत आठ राज्यातील १ लाख ३७ हजार २३ शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आले. ५८५ सेवाभावी संस्थाही या उपक्रमात सामील झाल्या. या माध्यमातून महाराष्ट्रात आतापर्यंत ३१ हजार ७०७ शाळा तंबाखूमुक्त झाल्याचा दावा यावेळी फाऊंडेशनतर्फे करण्यात आला.
या वेबिनारमध्ये ५७९ सेवाभावी संस्था, शिक्षक, आरोग्य विभागातील अधिकारी यांच्यासह यवतमाळ जिल्ह्यातील अवधुत वानखेडे, संदीप कोल्हे, कैलास गव्हाणकर हे शिक्षक समन्वयकही सहभागी झाले होते.
रविवारी तंबाखू विरोधी दिनी विशेष मोहीम
रविवारी ३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिवस आहे. विशेष म्हणजे, जागतिक आरोग्य संघटनेनेही यंदा ‘तंबाखू कंपन्यांच्या चक्रव्यूहातून युवकांना बाहेर काढणे’ ही मुख्य संकल्पना निश्चित केली आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ३१ मे रोजी विशेष मोहीम राबविण्याचे वेबिनारमध्ये निश्चित करण्यात आले. तंबाखू सेवनाने कोरोनाचा प्रसार वाढू शकतो. त्यामुळे आपली शाळा, घर, गाव तंबाखूमुक्त करावे, असे आवाहन आरोग्य संचालक डॉ. साधन तायडे यांनी केले. त्यासाठी सर्व शिक्षकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांनी केले.