‘मेडिकल’मध्ये पहिल्यांदाच ‘डेथबॉडी’ची टंचाई संपली
By Admin | Updated: February 2, 2016 02:06 IST2016-02-02T02:06:04+5:302016-02-02T02:06:04+5:30
डॉक्टरकी शिकणाऱ्या बुद्धिवान विद्यार्थ्यांना मृतदेहांची वाट पाहावी लागत होती.

‘मेडिकल’मध्ये पहिल्यांदाच ‘डेथबॉडी’ची टंचाई संपली
५ वर्षात २६ देहदान : जिल्ह्यातील आणखी ८०० दानदात्यांची देहदानाची तयारी
अविनाश साबापुरे यवतमाळ
डॉक्टरकी शिकणाऱ्या बुद्धिवान विद्यार्थ्यांना मृतदेहांची वाट पाहावी लागत होती. यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अॅनॉटॉमी विभागात मृतदेहाची कायमच टंचाई होती. चार मृतदेहांची गरज असताना एकही मिळत नव्हता. इतर जिल्हा रुग्णालयांकडे चक्क मृतदेहांसाठी याचना करावी लागत होती. मात्र, गेल्या काही दिवसात जिल्हावासीयांनी खऱ्या पुरोगामित्वाचा परिचय देत चक्क २६ देह दान केले आहेत. तर आणखी ८०० नागरिकांनी देहदानासाठी ‘मेडिकल’कडे अर्ज भरले आहेत.
साधारण पाच वर्षांपूर्वी येथील मेडिकल कॉलेजमधील शरीररचनाशास्त्र विभागात वर्षाला चार मृतदेहांची गरज भासायची. परंतु, एकही उपलब्ध होत नव्हता. पुणे, मुंबई, नागपूर, अकोलासारख्या जिल्ह्यातून मृतदेह ‘आयात’ करावे लागत होते. त्यातही चारची गरज असताना कधी दोन तर कधी तीनच मृतदेह मिळू शकत होते. विशेष म्हणजे, मोठ्या शहरात बेवारस स्थितीत आढळलेल्या मृतदेहांचाच यात प्रामुख्याने समावेश होता. परंतु, गेल्या पाच वर्षांत यवतमाळ जिल्ह्यात देहदानाबाबत जोरदार जनजागृती सुरू आहे. त्याचाच परिपाक म्हणून १ जानेवारी २०१० ते ३१ डिसेंबर २०१५ या पाच वर्षांत तब्बल २६ मृतदेह शरीररचनाशास्त्र विभागाला मिळू शकले. शिवाय गेल्या वर्षभरात जिल्हाभरातील तब्बल ८०० पेक्षा अधिक नागरिकांनी देहदानाची इच्छा दर्शविली आहे. त्यांनी शरीररचनाशास्त्र विभागाकडे रितसर अर्जही दाखल केले आहेत. त्यामुळे येत्या काळात यवतमाळात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मृतदेहांची चणचण भासण्याची शक्यताच नाही.
यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता विद्यार्थीसंख्या वाढली आहे. पूर्वी ५० विद्यार्थ्यांसाठी ४ मृतदेहांची गरज असतानाही ते मिळत नव्हते. आता १५० विद्यार्थी येथे अभ्यास करतात. त्यांना वर्षभरात ‘प्रॅक्टिकल’साठी साधारण १६ मृतदेहांची गरज आहे. त्यामुळे आता टंचाईदेखील अधिक भेडसावण्याची शक्यता होती. मात्र, जिल्हावासीयांनी दाखविलेल्या सजगतेमुळे सोळाची गरज असताना २० मृतदेह उपलब्ध आहेत.
नातेवाईकांनी भावना आवराव्या; शेजाऱ्यांनी धीर द्यावा
कोणताही मृतदेह मृत्यूनंतर सहा तासांच्या आत दान करता येतो. आधी रितसर अर्ज भरलेला नसेल तरी मृत्यू प्रमाणपत्र सादर करून ऐनवेळीही देहदान करता येते. परंतु, अनेकांना याची माहिती नसते. देहदानाच्या संकल्पाचा अर्ज भरणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांना देहदान करण्याचा धीरच होत नाही. भावनेच्या भरात आणि समाजातील प्रथांच्या दबावात ते अंत्यविधी उरकून टाकतात. अशा प्रकरणांमध्ये संबंधितांच्या शेजाऱ्यांनी मृतांच्या इच्छेचे त्यांच्या मुलाबाळांना स्मरण करून दिले पाहिजे. दिवंगत माणसाच्या देहदानाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी नातेवाईकांना मानसिक पाठबळ दिले पाहिजे. विशेष म्हणजे, एखादवेळी मृताचे नातेवाईक दूरच्या गावी असल्यास देहदानापूर्वी ‘मेडिकल’मध्ये तब्बल ७२ तास हा मृतदेह ४ अंश सेल्सिअस तापमानात सुरक्षित ठेवला जातो.
देहदानासाठी वाहतूक खर्चाची सवलत
बऱ्याच लोकांची देहदानाची इच्छा असते. पण ते नेमके कुठे करावे, हे ठाऊक नसते. शिवाय जिल्हास्थळापासून दूरच्या गावात मृत्यू झालेला असल्यास अनेकांपुढे मृतदेह यवतमाळात आणण्याचाही प्रश्न असतो.
अशा प्रकरणांमध्ये ‘मेडिकल’पर्यंत येण्या-जाण्याच्या खर्चापोटी संबंधित चालकाला शरीररचनाशास्त्र विभागातर्फे किमान ५०० रुपये किंवा १५ रुपये किलोमीटरप्रमाणे त्वरित वाहतूक खर्च अदा केला जातो. मात्र, शरीरावर जखम झालेले, खूप दिवस ‘बेड’वर खिळलेले, पोलीस प्रकरणांतील मृतदेह देहदानासाठी स्वीकारले जात नाहीत.
मृतदेह ‘साठविण्या’ची पद्धत
मृत्यूनंतर काही तासांनी देह सडण्याची प्रक्रिया सुरू होते. असा मृतदेह शिकाऊ डॉक्टरांच्या अभ्यासाकरिता उपयोगी ठरत नाही. त्यामुळे दान केलेला देह शरीररचनाशास्त्र विभागात येताच त्यावर ‘एम्बाल्मिंग’ केले जाते. यात ६० किलो वजनाच्या देहात सहा लिटर विशिष्ट रसायने सोडली जातात. त्यामध्ये फार्मालीन हा प्रमुख घटक असतो. सोबतच अँटी फंगल, अँटीबायोटिक्स, स्पिरीट आणि पाण्याचेही प्रमाण असते. हे सर्व मिश्रण मृत शरीरात सोडण्याचीही खास पद्धत आहे. मानेवरील विशेष नस थोडी बाहेर काढली जाते. त्याला छोटे छिद्र करून त्यातून सूक्ष्म नळी हृदयापर्यंत सोडली जाते. त्याद्वारे हे सहा लिटर द्रावण हृदयापर्यंत ‘प्रेशर मशीन’ने पोहोचविले जाते. हृदयापासून नंतर संपूर्ण शरीरात ते निट पोहोचले की नाही, याची एक टेस्ट घेतली जाते. त्यानंतर हीच सर्व द्रावणे टाकून असलेल्या टँकमध्ये बॉडी बुडवून (प्रिझर्व) ठेवली जाते. ही सर्व प्रक्रिया साधारण २० मिनिटात आटोपल्यावर संबंधित ‘बॉडी’ वर्षानुवर्षे अभ्यासासाठी वापरणे शक्य होते. असे असले तरी सुरवातीचे सहा महिने हा मृतदेह वापरला जात नाही. सहा महिन्यात आतील सर्व अवयव ‘सेट’ होतात.