भाजपाच्या चार उमेदवारांची पहिलीच विधानसभा वारी
By Admin | Updated: October 19, 2014 23:18 IST2014-10-19T23:18:39+5:302014-10-19T23:18:39+5:30
जिल्ह्यात उमरखेड, वणी, आर्णी आणि राळेगाव या चार मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार पहिल्यांदाच विधानसभेत जात आहे. वणी विधानसभा मतदारसंघातून अनपेक्षितरीत्या भाजपाचे संजीव रेड्डी

भाजपाच्या चार उमेदवारांची पहिलीच विधानसभा वारी
यवतमाळ : जिल्ह्यात उमरखेड, वणी, आर्णी आणि राळेगाव या चार मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार पहिल्यांदाच विधानसभेत जात आहे. वणी विधानसभा मतदारसंघातून अनपेक्षितरीत्या भाजपाचे संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी ४४ हजार ४५० मते मिळवून विजय संपादन केला. त्यांनी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेचे आव्हान झुगारुन पाच हजार ६७१ मते अधिक मिळविली. भाजपाने येथे काँग्रेसचे विद्यमान आमदार वामनराव कासावार यांचा पराभव केला. वणीत पहिल्यांदाच भाजपाला संधी मिळाली. राळेगाव मतदारसंघातून विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके यांचा भाजपाच्या प्रा.डॉ. अशोक उईके यांनी तब्बल ३८ हजार ७५० एवढ्या मताधिक्याने पराभव केला. तेथे शिवसेनेच्या उमेदवाराला अवघी पाच हजार मते मिळाली. आर्णी मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार राजू तोडसाम यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांचा २० हजार ७२१ मतांनी पराभव केला.
उमरखेड विधानसभा मतदारसंघात अपेक्षेनुसार भाजपाचे राजेंद्र नजरधने तब्बल ९० हजार १९० मते घेऊन विजयी झाले. २००९ च्या निवडणुकीत अवघ्या थोड्या मतांनी त्यांची विधानसभेची वारी हुकली होती. यावेळी मात्र त्यांनी ४८ हजार ५७६ मतांची आघाडी घेत विजय संपादन केला. तेथे कॉग्रेसचे विद्यमान आमदार विजय खडसे यांना ४१ हजार ६१४ मते मिळाली. शिवसेनेचे मुन्ना उर्फ शिवशंकर पांढरे हे तिसऱ्या तर राष्ट्रवादीचे मोहन मोरे चवथ्या क्रमांकावर राहिले.
दिग्रस मतदारसंघात दलित, मुस्लीम व कुणबी समाजाच्या एकजुटीवर राष्ट्रवादीचे वसंत घुईखेडकर यांनी ४१ हजार ३५२ मतांपर्यंत मजल मारली. मात्र त्यांना शिवसेनेची विजयी घोडदौड रोखता आलेली नाही. मोघेंच्या विरोधाचे बक्षीस म्हणून देवानंद पवार यांना येथून काँग्रेसने उमेदवारी दिली होती. मात्र १८ हजार ८०७ मतांसह ते तिसऱ्या तर भाजपाचे अजय दुबे १० हजार ९०२ मते घेऊन चौथ्या क्रमांकावर राहिले. आर्णी मतदारसंघात संदीप धुर्वे भाजपातून तिकीट नाकारल्याने ऐनवेळी शिवसेनेत आले होते. त्यांनी ३० हजार ९६६ मतांसह तिसरा क्रमांक गाठला. पुसदमध्ये माजी आमदार प्रकाश देवसरकर यांना २८ हजार ७९३ मते मिळाली. राष्ट्रवादीत बंड पुकारुन त्यांनी ऐनवेळी शिवसेनेशी घरठाव केला होता. पुसदमध्ये भाजपाचे वसंत पाटील १९ हजार १५५ मतांसह तिसऱ्या तर काँग्रेसचे अॅड. सचिन नाईक १५ हजार १७ मतांसह चौथ्या क्रमांकावर राहिले. काँग्रेसच्या स्थानिक व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी असहकार केल्याचा आरोप सचिन नाईक यांनी दोनच दिवसापूर्वी पत्रपरिषदेत केला होता. त्यांची मतांची संख्या पाहता या आरोपात तथ्य दिसू लागले आहे. ऐनवेळी पक्ष बदलणाऱ्या देवसरकर व धुर्वे यांना मतदारांनी नाकारल्याचे स्पष्ट होते. आर्णीतून अखेरपर्यंत भाजपाच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करणारे आणि ऐनवेळी राळेगाव मतदारसंघात राष्ट्रवादीची घड्याळ हाती बांधणारे अपक्ष जिल्हा परिषद सदस्य मिलिंद धुर्वे हे पाचव्या क्रमांकावर फेकले गेले. वणीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचा जोर असताना अचानक भाजपाने मुसंडी मारल्याने सर्वच अचंबित झाले आहेत. मोदींची सभा न होताही भाजपाने सात पैकी पाच जागांवर विजय मिळविला, हे विशेष. जिल्ह्यात महिला उमेदवारांची संख्या बोटावर मोजण्याएवढी होती. मात्र त्यांना टॉप फाईव्हमध्येही जागा मिळविता आली नाही. राष्ट्रवादीचे नेते संदीप बाजोरिया यांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. ते पाहता काँग्रेसचा सर्व जागांवर झालेला पराभव लक्षात घेता वामनराव कासावार काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देतात का याकडे लक्ष लागले आहे.