चमेडियानगरात गोळीबार

By Admin | Updated: June 23, 2016 01:57 IST2016-06-23T01:57:36+5:302016-06-23T01:57:36+5:30

स्थानिक तलावफैल परिसरातील चमेडियानगरात जुन्या वैमनस्यातून रिव्हॉल्वरने गोळी झाडून युवकाच्या खुनाचा

Firing in Chamediae | चमेडियानगरात गोळीबार

चमेडियानगरात गोळीबार

 युवकाच्या खुनाचा प्रयत्न : जुने वैमनस्य, सहा जणांचा हल्ला
यवतमाळ : स्थानिक तलावफैल परिसरातील चमेडियानगरात जुन्या वैमनस्यातून रिव्हॉल्वरने गोळी झाडून युवकाच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. पाठीत गोळी लागल्याने या युवकाला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी ४ वाजताच्या सुमारास सहा जणांनी रिव्हॉल्व्हर व धारदार शस्त्रे घेऊन सदर युवकाच्या घरात घुसून हा हल्ला केला.
या घटनेनंतर परिसरात तणावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी वेळीच घटनास्थळावर पोहोचून स्थितीवर नियंत्रण मिळविले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव राजकुमार रुपलाल प्रजापती (२५) असे आहे. तो वीटभट्टीवर मजुरीचे काम करतो. नेहमीप्रमाणे दुपारी घरी येऊन आराम करीत असताना अचानक सहा जणांनी प्राणघातक हल्ला केला. यावेळी राजकुमारने स्वत:ला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. या झटापटीत आरोपींनी केलेल्या गोळीबारात एक गोळी राजकुमारच्या पाठीत शिरली आणि तो कोसळला. त्यानंतर मात्र आरोपींनी तेथून पळ काढला.
राजकुमारला त्याच्या कुटुंबीयांनी शासकीय रुग्णालयात नेले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस, चार्ली पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी श्वान पथकही दाखल झाले. श्वानाने काही दूरपर्यंत मार्ग दाखविला. दरम्यान, शासकीय रुग्णालयात जखमी राजकुमारने आपल्यावर एकूण सहा जणांनी हल्ला केल्याचे सांगितले. यातील तिघांची नावे अनिकेत गावंडे, आशिष दांडेकर व शुभम बघेल अशी सांगण्यात आली. उर्वरित तिघांना आपण ओळखत नसल्याचे त्याने सांगितले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. (प्रतिनिधी)

Web Title: Firing in Chamediae

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.