बीअरबारमध्ये गोळीबार
By Admin | Updated: December 30, 2014 23:44 IST2014-12-30T23:44:14+5:302014-12-30T23:44:14+5:30
दोन मित्र दारू पिण्यासाठी बसले. त्यांच्यात आर्थिक व्यवहाराची चर्चा सुरू झाली. मात्र काही वेळातच या चर्चेने वेगळे वळण घेतले. त्यातूनच एकाने आपली परवानाप्राप्त रिव्हॉल्वर काढून बारमध्येच

बीअरबारमध्ये गोळीबार
हॉटेलच्या काचा फुटल्या, पाच हजारांची तत्काळ भरपाई
यवतमाळ : दोन मित्र दारू पिण्यासाठी बसले. त्यांच्यात आर्थिक व्यवहाराची चर्चा सुरू झाली. मात्र काही वेळातच या चर्चेने वेगळे वळण घेतले. त्यातूनच एकाने आपली परवानाप्राप्त रिव्हॉल्वर काढून बारमध्येच गोळीबार केला. सुर्दैवाने त्यात जीवित हानी झाली नाही. मात्र बारमधील तमाम उपस्थितांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली.
चार दिवसांपूर्वी दारव्हा रोडवरील एका पॉश हॉटेलच्या बीअरबारमध्ये मध्यरात्री ही खळबळजनक घटना घडली. याबाबत हॉटेल व्यवस्थापनाकडून प्रचंड गोपनीयता पाळली जात आहे. यवतमाळातीलच एक टाईल्स व्यावसायिक आपल्या बाहेरगाववरून आलेल्या मित्रांसमवेत दारू पिण्यासाठी सदर बारमध्ये गेला. तेथे मध्यरात्रीपर्यंत त्यांचे पेग रिचविणे सुरू होते. सोबतच चर्चाही रंगली. मात्र काही क्षणातच या चर्चेला हिंसक वळण लागले. एकमेकांना शिवीगाळ सुरू झाली. त्यातच सदर टाईल्स व्यावसायिकाने अचानक रागाच्या भरात आपली रिव्हॉल्वर काढून गोळीबार केला. सुदैवाने हा गोळीबार हवेत झाला. पहिलीच गोळी झाडल्याने पार्टी करणाऱ्या दुसऱ्या साथीदारासह सर्वच जण दहशतीत सापडले. त्या साथीदाराने वेळीच नमते घेतल्याने अनर्थ टळला. झाडलेल्या गोळीमुळे हॉटेलमधील काचा तडातड फुटल्या. त्यामुळे शुद्धीवर आलेल्या आणि संभाव्य कारवाईची जाणीव झालेल्या त्या टाईल्स व्यावसायिकानेही लगेच नांग्या टाकल्या. त्याने हॉटेलमधील काचांच्या नुकसानीपोटी तत्काळ पाच हजार रुपयांची भरपाई देऊन प्रकरण पोलिसात नेऊ नका, अशी विनवणी केली. पोलिसांचाही चौकशीचा ससेमिरा मागे लागण्याच्या भीतीने हॉटेल व्यवस्थापनानेही तक्रार देणे टाळले. यवतमाळ शहरातील टाईल्स व्यावसायिकाच्या या गोळीबाराची हॉटेल उद्योग जगतात चांगलीच चर्चा आहे. या प्रकरणी सदर हॉटेलमध्ये विचारणा केली असता अशी काही घटना घडल्याचे आपल्या स्मरणात नसल्याचे ‘लोकमत’ला सांगण्यात आले. पोलीस दप्तरीही अशा कोणत्याही घटनेची नोंद नाही. (जिल्हा प्रतिनिधी)