अखेर ‘त्या’ बेवारस औषधप्रकरणी गुन्हा, सहायक आयुक्तांनी दिली तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 13:02 IST2023-07-13T13:02:11+5:302023-07-13T13:02:32+5:30
जळका गावालगत पांडवदेवी देवस्थान परिसरात मुदतबाह्य औषधांचा साठा बेवारसरीत्या फेकून दिल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता.

अखेर ‘त्या’ बेवारस औषधप्रकरणी गुन्हा, सहायक आयुक्तांनी दिली तक्रार
मारेगाव (यवतमाळ) : तालुक्यातील करंजी येथून जवळच असलेल्या जळका गावालगत पांडवदेवी देवस्थान परिसरात मुदतबाह्य औषधांचा साठा बेवारसरीत्या फेकून दिल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता. ‘लोकमत’च्या वृत्तानंतर अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्तांनी रविवारी घटनास्थळी भेट देऊन औषधांची पडताळणी केली होती. अखेर याप्रकरणी आयुक्तांच्या तक्रारीवरून मारेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे ही औषधी नेमकी कोणी फेकली व कोणाची आहेत, याचा छडा लागण्याची शक्यता आहे.
पांडवदेवी देवस्थान परिसरात ही औषधे फेकून देण्यात आली होती. हा प्रकार बेकायदेशीर, तसेच नियमबाह्य आहे. ग्रामीण भागासाठी आलेली औषधे वेळेत वितरित होणे अपेक्षित आहे. एखादा स्टाॅक मागणीअभावी मुदतबाह्य झाल्यास शिल्लक औषधांचा रीतसर अहवाल संचालक स्तरावर पाठवावा लागतो. शिवाय शिल्लक औषधी नियमानुसारच नष्ट करावी लागते. मात्र, या सर्व बाबींकडे कानाडोळा करून देवस्थान परिसरातील जंगल भागात उघड्यावर औषधी फेकण्यात आली. यामुळे जनावरांना विषबाधा होण्याचाही धोका होता. ‘लोकमत’ने हे वृत्त चव्हाट्यावर आणल्यानंतर अन्न व औषधी प्रशासनातील सहायक आयुक्त मिलिंद कृष्णराव काळेश्वरकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर मारेगाव पोलिस ठाण्यात याप्रकरणी रीतसर तक्रार केली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. आता आरोपीचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलिस प्रशासनासमोर आहे.
कोणाला जास्त झाली एवढी औषधे
अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद काळेश्वरकर यांनी रविवारी सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून बेवारस फेकलेल्या औषधांची पडताळणी केली. त्यानंतर त्यांनी मुदतबाह्य औषधी गोळा करून चौकशीकरिता ताब्यातही घेतली. त्यानंतरच या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. एकीकडे औषधांचा तुटवडा असल्याने शासकीय रुग्णालयातून रुग्णांना माघारी परतावे लागते. ही औषधे शासकीय असतील तर कोणत्या रुग्णालयाला जास्तीच्या औषधांचा पुरवठा झाला, की या रुग्णालयाकडून योग्य वाटप झाले नाही, हेही आता चौकशीनंतर पुढे येईल.