केमिकल कंपनीत शेड कोसळून महिला कामगार ठार, सातजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 18:44 IST2025-06-26T18:42:42+5:302025-06-26T18:44:05+5:30
Yavatmal : एक महिला कामगार जागीच मरण पावली तर इतर सात कामगार जखमी

Female worker killed, seven injured as shed collapses at chemical company
संतोष कुंडकर
वणी (यवतमाळ) : बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसादरम्यान, झरी तालुक्यातील गणेशपूर (खडकी) येथील डीलाईट केमिकल कंपनीतील टिनाचे शेड कोसळून भीषण दुर्घटना घडली. यात एक महिला कामगार जागीच मरण पावली तर इतर सात कामगार जखमी झाले.
घटनेनंतर रात्रीच सर्व जखमींना तातडीने वणी येथील एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हे सर्वजण किरकोळ जखमी असल्याने त्यांच्यावर उपचार करून नंतर त्यांना सुटी देण्यात आली. गंगा सुग्रीवलाल (२१) असे मृत महिला कामगाराचे नाव असून ही महिला छत्तीसगड राज्यातील पेरिटोला गावातील रहिवासी आहे.
गुरूवारी दुपारी तिच्या मृतदेहाचे विच्छेदन करून मृतदेह तिच्या मूळ गावी रवाना करण्यात आला. बुधवारी रात्री वणी, झरी उपविभागात संततधार पावसाने हजेरी लावली. यावेळी सोसाट्याचा वारा वाहत होता. अशातच गणेशपूर खडकी येथील डिलाईट केमिकल कंपनीत काम करीत असलेल्या कामगारांच्या अंगावर टिनाचे शेड कोसळले. हे सर्व कामगार रात्रपाळीत काम करीत होते. या दुर्घटनेत गंगा सुग्रीवलाल ही महिला गंभीररित्या जखमी होऊन जागीच मरण पावली, तर सचिन दिलीप चांदेकर (२७) रा. कृष्णानपूर, पुष्पा नामदेव उईके (४०) नामदेव कुज्जा उईके (४५), लताबाई तलांडे सर्व रा.रा.येरगव्हाण (ता.कोरपना, जिल्हा चंद्रपूर), डोमा ग्यानबा भरणे (४५), रा.सगनापूर ता.मारेगाव, मिनाबाई आत्राम (४२), निराशा कंवर (४२) रा.छत्तीसगड हे या दुर्घटनेत जखमी झाले.
बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास वादळी पाऊस सुरू असताना कंपनीतील ५० फूट उंच असलेले टिनाचे शेड अचानक कोसळले. यावेळी या शेडमध्ये रात्रपाळीत काम करणारे १५ कामगार काम करीत होते. या घटनेचा तपास मुकूटबन पोलिस करीत आहेत.
कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गणेशपूर शिवारातील डिलाईट केमिकल कंपनीत चुनखडीपासून व्हाईट वॉश लाइम पावडर तयार करून पॅकिंग करण्याचे काम केले जाते. या कंपनीत वणी झरी परिसरातीलच नव्हे तर छत्तीसगढ राज्यातील कामगारदेखील कामाला आहेत. मात्र या घटनेनंतर कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कंपनी कायद्यानुसार कंपनीने कामगारांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्या आहेत, हा स्वतंत्र चौकशीचा भाग ठरणार आहे. पोलिस आता या प्रकरणी नेमकी काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.