भरधाव बोलेरो पुलाच्या कठड्यावर आदळली, पिता-पुत्र जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2022 14:44 IST2022-04-13T14:42:53+5:302022-04-13T14:44:12+5:30
ही धडक एवढी जबरदस्त होती की, वाहनातील दोघेही जागीच ठार झाले.

भरधाव बोलेरो पुलाच्या कठड्यावर आदळली, पिता-पुत्र जागीच ठार
पांढरकवडा (यवतमाळ) : नागपूरहून हैदराबादकडे भरधाव जाणारी बोलेरो पिकअप गाडी पुलाच्या कठड्यावर आदळून झालेल्या अपघातात पिता-पुत्र जागीच ठार झाले. हा अपघात नागपूर - हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर धारणा गावानजीकच्या लहान पुलावर बुधवारी (दि. १३) सकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान झाला.
विठ्ठल जंगम श्रीनिवास (२०) व जंगम श्यामसुंदर श्रीनिवास (५०) अशी मृतांची नावे असून, ते तेलंगणातील नरसम पेठ (जि. वारंगल) येथील रहिवासी आहेत. दोघे पिता-पुत्र काल मंगळवारी (टीएस २४, टी ९२६३) क्रमांकाच्या बोलेरो पिकअप गाडीने नरसम पेठ येथून मिरची भरून ती नागपूर येथे विकण्यासाठी गेले होते.
मिरची विकून नागपूरहून परत येत असताना मार्गात धारणा येथील उड्डाणपूल ओलांडून पुढे जात नाहीत, तोच लहान पुलाच्या कठड्याला भरधाव येणाऱ्या बोलेरो पिकअप गाडीने धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, वाहनातील दोघेही जागीच ठार झाले.
या अपघाताची माहिती करंजी वाहतूक पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मुपडे, पोलीस उपनिरीक्षक किशोर शहारे यांना मिळताच, ते आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळावर पोहोचले. त्यांनी धारणा येथील गावकऱ्यांच्या मदतीने मृतांना गाडीतून बाहेर काढले. मृतदेह पांढरकवडा येथे उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले असून, पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु आहे. चालकाला झोपेची डुलकी आल्यामुळे वाहन अनियंत्रित झाले असावे व हा अपघात झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.