मोदींच्या यवतमाळ जिल्ह्यातील चाय पे चर्चामधील दाभडीत तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 10:25 IST2017-12-12T10:22:44+5:302017-12-12T10:25:24+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘चाय पे चर्चा’ने संपूर्ण देशात प्रसिद्धीस आलेल्या दाभडी (ता. आर्णी) येथील कैलास किसन मानकर (२७) या तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी ६ वाजता घडली.

मोदींच्या यवतमाळ जिल्ह्यातील चाय पे चर्चामधील दाभडीत तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘चाय पे चर्चा’ने संपूर्ण देशात प्रसिद्धीस आलेल्या दाभडी (ता. आर्णी) येथील कैलास किसन मानकर (२७) या तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी ६ वाजता घडली.
कैलासकडे स्वत:ची तीन एकर शेती असून यंदा पाच एकर शेती मक्त्याने घेतली होती. वडिलांचे निधन झाल्यानंतर तोच घरातील कर्ता पुरुष होता. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून कैलासने विषप्राशन केले.
दाभडी गावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी २० मार्च २०१४ रोजी ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रम घेऊन संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते. शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्याचे आश्वासन देशातील शेतकऱ्यांना दिले होते. विशेष म्हणजे दाभडी गावाची निवड सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांमुळेच करण्यात आली होती. आतापर्यंत दाभडीत १७ शेतकरी आत्महत्या झाल्या असून ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमानंतर ही दुसरी आत्महत्या आहे. दाभडीतील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबले नसल्याचे कैलासच्या आत्महत्येवरून पुढे आले आहे.