शेतकऱ्यांचे धान्य उघड्यावर

By Admin | Updated: March 29, 2015 00:10 IST2015-03-29T00:10:37+5:302015-03-29T00:10:37+5:30

येथील बाजार समितीत धान्यमालाची विक्रमी आवक होत असताना व्यापाऱ्यांचे धान्य शेडमध्ये आणि शेतकऱ्यांचे धान्य उघड्यावर ठेवले जात आहे.

The farmers open the grains | शेतकऱ्यांचे धान्य उघड्यावर

शेतकऱ्यांचे धान्य उघड्यावर

पुसद : येथील बाजार समितीत धान्यमालाची विक्रमी आवक होत असताना व्यापाऱ्यांचे धान्य शेडमध्ये आणि शेतकऱ्यांचे धान्य उघड्यावर ठेवले जात आहे. बाजार समितीच्या निष्क्रिय धोरणामुळे व्यापाऱ्यांची मनमानी वाढल्याने शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे.
जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाची बाजार समिती म्हणून पुसद बाजार समितीची ओळख आहे. सध्या या बाजार समितीत दररोज गहू, हरभरा, तूर व सोयाबीनची प्रचंड आवक होत आहे. लग्नसराईचे दिवस असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बाजारात शेतमाल विक्रीसाठी आणला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बांधण्यात आलेल्या ओट्यावर शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांचा माल ठेवला जातो. परिणामी शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये विक्रीस आणलेला शेतमाल जमिनीवर ठेवून त्याचा लिलाव केला जातो. अचानक वादळी पाऊस झाला म्हणजे शेतकऱ्यांचा माल भिजून त्यांचे नुकसान होते. शेतकरी संतप्त झाले तर तेवढ्यापुरती त्यांची समजूतन घातली जाते. पुन्हा स्थिती जैसे थे होते.
पुसद बाजार समितीत शेतकऱ्यांच्या शेतमालाचा लिलाव करण्यासाठी बाजार समितीत दोन मोठे शेड बांधलेले आहेत. या दोन्ही शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यापाऱ्यांचा माल ठेवलेला आहे. पुसद तालुक्यासह शेजारील तालुक्यातून हजारो क्विंटल धान्यमालाची आवक रोज होते. तेवढा शेतमाल ओट्यावर ठेवून त्याचा लिलाव करण्याची क्षमता असताना तेथे व्यापाऱ्यांचा माल कित्येक दिवसांपासूनच जागा अडवून असल्याने शेतकऱ्यांचा शेतमाल जमिनीवर ठेवून त्याचे लिलाव
करावा लागत असल्याची स्थिती आज पुसद बाजार समितीत पाहावयास मिळते.
या ठिकाणी शेतकऱ्यांना आपला माल उघड्यावर ठेवावा लागत आहे. परंतु व्यापाऱ्यांनी आपला धान्य माल मार्केटच्या शेडमध्ये खुला ठेवला आहे. परंतु बाजार समितीचे पदाधिकारी गप्प आहेत. बाजार समितीत कोणत्या मालाची खरेदी केव्हाही केली जात असल्याने शेतकरी गोंधळून जातात. खेड्यावरून गहू, हरभरा, तूर विक्रीसाठी आणले तर नेमके त्याच दिवशी सोयाबीनची खरेदी केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव बाहेरील व्यापाऱ्यांना आपला माल कवडीमोल भावात विकावा लागतो. या बाबत काही शेतकऱ्यांनी आपली भावना बोलून दाखविली.
शेतकरी खेड्यापाड्यामधून त्यांचा शेतमाल वाहने भाड्याने करून हमालांना हमाली देवून विक्रीसाठी बाजार समितीमध्ये आणतात. तो लिलावास ठेवण्यासाठी तेथे बांधलेल्या ओट्यांवर त्या मालास जागा मिळत नाही, हे चित्र बदलून तेथे शेतकऱ्यांचा शेतमाल ठेवण्यास प्राधान्य दिले पाहिजे.
या बाबत खरे तर शेतकऱ्यांचे पुत्र असलेल्या बाजार समितीच्या संचालकांनी पुढाकार घ्यायला हवा पण ते का घेत नाहीत. हे शेतकऱ्यांकरिता एक कोडेच आहे. व्यापारी शेतकऱ्यांची पिळवणूक करीत असून बाजार समिती प्रभारी सभापतीसह संचालक बघ्याची भूमिका घेतात अशी अनेक शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. बाजार समितीत शेतकऱ्यांसाठी कुठल्याही सुविधा नाही.
(तालुका प्रतिनिधी)
सुविधांचा अभाव
शौचालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यासारखी आहे. मुख्य प्रवेशद्वारासमोर मोटारसायकली आणि इतर वाहने उभी असतात. त्यामुळे गाडी घेवून मार्केट यार्डात प्रवेश करणे अडचणीचे जाते. स्वच्छता व उन्हाळ्यात उन्हापासून बचाव व्हावा यासाठी शेतकऱ्यांना आराम करण्यासाठी शेतकरी भवन नाही. बाजार समितीच्या बाहेर परिसरात मोठ्या प्रमाणात व्यापारी धान्यमाल खरेदी करून मार्केटचा हजारो रुपयांचा सेस बुडवित आहे.

Web Title: The farmers open the grains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.