दोन दिवसापूर्वी मुलीचे कन्यादान करणाऱ्या शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 22:10 IST2019-05-28T22:10:26+5:302019-05-28T22:10:45+5:30
सततच्या नापिकीमुळे कर्जाचा डोंगर या शेतकऱ्यावर होता. यातच दोन दिवसापूर्वी त्यांच्या मुलीचे लग्न झाले

दोन दिवसापूर्वी मुलीचे कन्यादान करणाऱ्या शेतकऱ्याची आत्महत्या
यवतमाळ- नेर तालूक्यातील पांढरी(शिरजगाव) येथील एका शेतकऱ्याने स्वत:च्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज राञी साडेआठ वाजता घडली. विशेष म्हणजे या शेतकऱ्याने दोन दिवसापूर्वी कन्यादान करून मुलीला सासरी पाठवले होते. माञ नववधूचे स्वप्न सुरू असताना आज तिच्या पित्याच्या मृत्यूची घटना घडली.
बंडू उद्धवराव कांबळे(वय ५५ )असे या शेतकऱ्याचे नाव आहे. सततच्या नापिकीमुळे कर्जाचा डोंगर या शेतकऱ्यावर होता. यातच दोन दिवसापूर्वी त्यांच्या मुलीचे लग्न झाले. आज या मुलीला त्यांनी निरोप दिला. सत्यनारायण पूजा झाली. राञी सर्व आराम करत अंसताना बंडू एका खोलीत गेला व त्याने गळफास लावून आत्महत्या केली.
बंडू वडिलोपार्जीत ८ एकर शेती दोन भावासह करायचा. माञ सततच्या नापिकीने डोक्यावर कर्जाचा डोंगर जमा झाला होता. उसनवार काढून त्याने आपल्या मूलीचे दोन दिवसापूर्वी लग्न केले. आज तिला त्याने निरोप दिला. मृतक बंडूला अजून एक मुलगी असून एक मुलगा आहे. सततच्या नापिकीने माझ्या मुलांचे भवितव्य अंधारात जाणार अशी खंत त्यांनी अनेकाकडे बोलून दाखवली. मूलीला निरोप देऊन ते स्वत:च्या खोलीत गेले व दाराच्या आडाला दोर बांधून आत्महत्या केली. लग्न घरातच या घटनेने वातावरन शोकसागरात बुडाले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.