Farmers' attitude towards private shopping in Ralegaon | राळेगावात शेतकऱ्यांचा कल खासगी खरेदीकडे
राळेगावात शेतकऱ्यांचा कल खासगी खरेदीकडे

ठळक मुद्देखासगी खरेदी ८० हजार क्विंटल : सीसीआयकडे केवळ १२ हजार क्विंटल

के.एस. वर्मा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राळेगाव, वाढोणाबाजार व खैरी येथील मार्केट यार्डवरील खासगी कापूस खरेदीत सद्यस्थितीत चार हजार ७०० ते पाच हजार रुपयांपर्यंतचे दर शेतकऱ्यांना मिळत आहे. केंद्र शासनाच्या अखत्यारितील सीसीआयची खरेदी तालुक्यात राळेगाव, वाढोणाबाजार व खैरी येथे सुरू झाली आहे.
खासगी खरेदी शुक्रवारपर्यंत ८० हजार क्विंटल झाली. राळेगाव ७३ हजार, वाढोणाबाजार सहा हजार आणि खैरी येथे २६० क्विंटल कापूस खरेदी झाला. त्या तुलनेत सीसीआयला पहिल्या पाच दिवसात केवळ १२ हजार क्विंटल कापूस खरेदीत मिळाला आहे. राळेगावमध्ये तीन हजार, वाढोणा तीन हजार ८०० आणि खैरी पाच हजार क्विंटल कापूस खरेदी झाला. राळेगावात सात, वाढोणाबाजार तीन, खैरी येथे एक व्यापारी खरेदीत उतरले आहे.
राळेगावला दररोज सरासरी पाच-सात हजार, वाढोणात एक हजार क्विंटल कापूस खासगीत खरेदी केला जात आहे. खासगीत खरेदीच्या तुलनेत सीसीआयची खरेदी केवळ १२-१३ टक्के एवढीच आहे. खासगीत कापूस विक्री करावी लागत असल्याने शेतकऱ्यांचे क्विंटल मागे ५०० ते ८०० रुपये नुकसान होत आहे. त्यात नगदी पैसे, आत्ताच पाहिजे या आग्रहामुळे ते स्वत:चे फार मोठ्या प्रमाणात नुकसान करून घेत असल्याचे मार्केटमध्ये फेरफटका मारला असता चर्चेअंती समजले.

बाजार समिती व सीसीआयकडून अपेक्षा
सीसीआयला कापूस विकू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांकरिता मार्केट यार्डवर बाजार समितीने वेगळे ठिकाण वाहन व बैलबंड्यांकरिता राखून ठेवण्याची गरज आहे. त्यातच समितीने शेतकऱ्यांचा कापसाचा ओलावा (मॉइश्चर) मोजून तो प्रमाणित प्रतीवर उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे मत शेतकऱ्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीजवळ व्यक्त केले. सीसीआयनेही १२ टक्के ओलाव्याची अट दरवेळी धरून न ठेवता शेतकऱ्यांप्रती संवेदनशीलता ठेवावी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही अट थोडीफार शिथील करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी त्याकरिता आवाज उचलण्याची गरजही व्यक्त होत आहे. मार्केट यार्डात व्यापाºयांच्या गराड्यात सीसीआयला शोधणे कठीण जात असल्याचे शेतकºयांनी सांगितले.

Web Title: Farmers' attitude towards private shopping in Ralegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.