Eligibility of 31 thousand candidates for the post of teacher will end | ३१ हजार उमेदवारांची शिक्षक पदाची पात्रता संपणार

३१ हजार उमेदवारांची शिक्षक पदाची पात्रता संपणार

ठळक मुद्देभरती मात्र तीन वर्षांपासून अर्धवट२०१३ मध्ये टीईटी पास झालेले प्रतीक्षेतअभियोग्यता धारकांचीही बोळवण

अविनाश साबापुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : तीन वर्षांपासून सुरू झालेली शिक्षक भरती प्रक्रिया अद्यापही पूर्णत्वास गेलेली नाही. तर दुसरीकडे राज्यातील ३१ हजार टीईटीधारक उमेदवारांची पात्रताच आता डिसेंबरमध्ये संपुष्टात येणार आहे.
राज्यात शिक्षक भरतीसाठी २०१३ मध्ये पहिल्यांदा शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यात आली. त्यावेळी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पात्रतेची ‘वैधता’ सात वर्षे राहील, असा निकष केंद्र शासनाने जाहीर केला. गेल्या सात वर्षात वेळोवेळी झालेल्या परीक्षेत एकूण ८६ हजार २९८ उमेदवार पात्र ठरले. तर पहिल्या वर्षी म्हणजे २०१३ मध्ये उत्तीर्ण झालेल्या ३१ हजार ७२ विद्यार्थ्यांच्या पात्रतेची ‘वैधता’ डिसेंबर २०२० मध्ये संपुष्टात येणार आहे.

२०१३ नंतर राज्यात थेट २०१७ मध्येच शिक्षक भरतीला परवानगी मिळाली. तेव्हा अभियोग्यता चाचणीही बंधनकारक करण्यात आली. त्यात प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक पदासाठी पावणे दोन लाख उमेदवारांनी परीक्षा दिली. परंतु, चक्क दोन वर्षानंतर म्हणजे आॅगस्ट २०१९ मध्ये उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले. त्यातही केवळ ५ हजार ८२२ उमेदवारांचीच पहिली यादी आली. त्यानंतर पुढील यादीची प्रतीक्षा अद्यापही कायम आहे.
आता २०१३ मध्ये टीईटी उत्तीर्ण झालेल्या ३१ हजार उमेदवारांची ‘वैधता’च संपणार असल्याने दुसºया यादीत त्यांचा समोवश होतो किंवा नाही, याबाबत सभ्रम निर्माण झाला आहे. तर कोरोनामुळे मे महिन्यापासून शिक्षक भरतीवर पुन्हा एकदा बंदी आणली गेली आहे.

पवित्र पोर्टलद्वारे सुरू झालेली आणि अर्धवट असलेल्या शिक्षक भरतीला विशेष परवानगी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री आणि वित्तमंत्र्यांकडे लेखी स्वरुपात केली आहे.
_ संतोष मगर
अध्यक्ष, डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशन

Web Title: Eligibility of 31 thousand candidates for the post of teacher will end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.