विधानसभा निवडणूक : चार मतदार संघात दिसतेय एकजूटयवतमाळ : जिल्ह्यात कुणबी-मराठा मतदारांची संख्या लाखोंची असताना एकही आमदार नाही, असा प्रचार करीत या विधानसभा निवडणुकीत या मतदारांची एकजूट होताना दिसत आहे. मात्र ही एकजूट चार मतदारसंघात अन्य उमेदवारांच्या पथ्यावर पडणार आहे. कारण या एकजूटीमुळे अन्य समाजही तेवढ्याच ताकदीने एकवटतो आहे. विधानसभेचे सात पैकी तीन मतदारसंघ आरक्षित आहेत. आर्णी आणि राळेगाव एसटीसाठी तर उमरखेड हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. पुसद, दिग्रस, यवतमाळ आणि वणी हे चार मतदारसंघ खुले आहेत. या चारच मतदारसंघात कुणबीसह अन्य समाजाने लक्ष केंद्रीत केले आहे. वणीत शिवसेनेकडून विश्वास नांदेकर, राष्ट्रवादीचे संजय देरकर, यवतमाळात काँग्रेसचे राहुल ठाकरे, शेतकरी विकास आघाडीचे डॉ.रवींद्र देशमुख, ओबीसी आरक्षण परिषदेचे प्रदीप वादाफळे, दिग्रसमध्ये राष्ट्रवादीचे वसंत घुईखेडकर, पुसदमध्ये शिवसेनेचे प्रकाश पाटील देवसरकर हे प्रमुख कुणबी उमेदवार रिंगणात आहेत. कुणबी समाजाचे राजकारण सध्या याच प्रमुख उमेदवारांभोवती फिरते आहे. जिल्ह्यात दिग्रस, वणी व यवतमाळात समाजाची एकजूट पहायला मिळत आहे. तसे संदेश मोबाईलवरून आणि माऊथ पब्लिसिटीद्वारे फिरत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर कुणबी-मराठा समाजाच्या एकजुटीसाठी प्रयत्न होत आहेत. ती पूर्णत: होणार की नाही याबाबत साशंकता आहे. कारण यापूर्वीही अनेकदा असे प्रयत्न झाले आणि फसलेसुद्धा. परंतु दुसरीकडे कुणबी-मराठा मतदार एकत्र येत असल्याच्या चर्चेनेच अन्य समाज एकवटू लागला आहे. अन्य बहुसंख्य असूनही सत्तेत स्थान न मिळणारा तसेच अल्पसंख्यक सर्वच समाज मराठेत्तर उमेदवाराच्या पाठीशी एकवटताना दिसतो आहे. अप्रत्यक्षपणे कुणबी-मराठा समाजाच्या मतदारांची होऊ घातलेली एकजूट मराठेत्तर उमेदवाराच्या पथ्यावर पडणारी ठरणार आहे. अन्य समाजही एकवटत असल्याने त्याचा फायदा मराठेत्तर उमेदवाराला निवडणुकीत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वणी विधानसभा मतदारसंघात कुणबी-मराठा मतांचे विभाजन नेहमीच काँग्रेससाठी फायद्याचे राहिले आहे. त्या बळावरच आतापर्यंत वामनराव कासावार निवडून आले आहे. यावेळीसुद्धा राष्ट्रवादीचे संजय देरकर आणि शिवसेनेचे विश्वास नांदेकर यांच्यात मतविभाजन होणार आहे. त्याचा फायदा निश्चितच काँग्रेस, मनसेला होण्याची चिन्हे आहे. कुणबी-मराठा समाजाच्या एकजुटीचे प्रयत्न होत असताना वणीत शिवसेना व राष्ट्रवादीच्या उमेदवारीच्या वेळी या समाजात ही एकजुट का पाहायला मिळाली नाही, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
निवडणुकीत जाती एकवटतेय
By admin | Updated: October 12, 2014 23:36 IST