Election department ready, code of conduct awaited | निवडणूक विभाग सज्ज, आचारसंहितेची प्रतीक्षा

निवडणूक विभाग सज्ज, आचारसंहितेची प्रतीक्षा

ठळक मुद्देसात आमदार, २१ लाख मतदार : १३ हजार कर्मचाऱ्यांची फौज, १० हजार यंत्रे, २४९९ मतदान केंद्र

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांतील सात आमदारांच्या निवडीसाठी २१ लाख ७२ हजार २०५ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. हे मतदान आपल्याच पारड्यात पडावे म्हणून सत्ताधारी, विरोधक आणि अपक्षांसह प्रत्येक इच्छूक उमेदवार तयारीला लागले आहेत. सभा, समारंभ, उत्सव आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मतदारराजा कुणाच्या झोळीत मतदान टाकणार, हे मतमोजणीनंतरच कळणार आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कुठल्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वीच जिल्हा प्रशासनाने निवडणूकीची संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी १३ हजार कर्मचाऱ्यांची फौज सज्ज ठेवण्यात आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सहा पथकांची निर्मिती करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सात विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीपूर्वीची संपूर्ण तयारी युद्धपातळीवर आटोपली आहे. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी १२ हजार ९९५ कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. २४९९ मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. चार हजार ६१८ ईव्हीएम मशिन बोलविण्यात आल्या आहेत. ३४१९ सीयू ३६९९ व्हीव्हीपॅट मशिन सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
प्रत्येक मतदान केंद्रावर चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यामध्ये एक मतदान केंद्राध्यक्ष १, २, ३ मतदान अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे. प्रत्येक मतदान केंद्राबाहेर दोन पोलीस कर्मचारी नियुक्त राहणार आहे. यासोबतच संवेदनशिल केंद्रावर विशेष पोलीस पथकांची नजर राहणार आहे.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सहा पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. फ्लार्इंग स्कॉड मतदारसंघातील गैरप्रकार रोखण्यासाठी व्हिडीओ चित्रीकरण करणार आहे. स्टॅटेस्टिक सर्व्हिलंस टिम गावाबाहेर चेकपोस्टवरील वाहनांची तापसणी करणार आहे. व्हिडिओ सर्व्हीलंस टिम सभांचे चित्रीकरण, आक्षेपहार्ह भाषणावर लक्ष केंद्रित करणार आहे.
व्हिडिओ व्हिविंग टिम गावातील चित्रीकरण सभांचे दृश्य, खर्च हिशेब तपासणार आहे. अकाउंटिंग टिम उमेदवारांचा खर्च नोंदविणार आहे. तर क्षेत्रीय अधिकारी संपूर्ण मतदान केंद्राची माहिती, सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करणार आहे.
मतमोजणी मतदारसंघाच्या मुख्यालयी
मतदारसंघातील मुख्यालयाच्या ठिकाणी मतमोजणीची संपूर्ण व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यावर व्हिडिओ कॅमेरॅची नजर असणार आहे. वणी, केळापूर, राळेगाव, यवतमाळ, दारव्हा, पुसद आणि उमरखेड या ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. दिग्रस विधानसभा क्षेत्राची मतमोजणी दारव्ह्यात पार पडणार आहे. आर्णी विधानसभा क्षेत्राची मतमोजणी केळापुरात पार पडणार आहे.
अपंगांना व्हीलचेअर
विधानसभा क्षेत्रात अपंग मतदारांना मतदान केंद्रात कुठलाही त्रास होऊ नये म्हणून व्हीचेअर ठेवली जाणार आहे. एक मतदारयादी पुस्तिकाही या ठिकाणी ठेवली जाणार आहे. प्रथमोपचार पेटी या ठिकाणी ठेवली जाणार आहे.
तक्रार निवारणासाठी १९५ नंबर
निवडणुकीच्या कार्यकाळात तक्रार निवारण करण्यासाठी आणि मतदारयादीतील दुरूस्तीकरिता १९५ टोल फ्री नंबरची व्यवस्था करण्यात आली आहे. यावर मतदारांना आपली तक्रार नोंदविता येणार आहे.

महिलांसाठी दोन केंद्र
प्रत्येक विधानसभा क्षेत्रात किमान दोन महिला मतदान केंद्र चालविणार आहेत. मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी महिलाच असणार आहे. महिला सुरक्षा रक्षक असणार आहे. शहराच्या ठिकाणी अशा केंद्रांची निवड होणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली संयुक्त आढावा बैठक
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता दोन दिवसांत लागण्याचे संकेत आहेत. तत्पूर्वी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी मंगळवारी सर्व यंत्रणांची संयुक्त बैठक घेऊन आढावा घेतला. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक सुरेंद्र मनपिया यांच्यासह जिल्ह्यातील सर्व एसडीओ, तहसीलदार, एसडीपीओ, ठाणेदार उपस्थित होते.

Web Title: Election department ready, code of conduct awaited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.