भरधाव ट्रक पुलाखाली काेसळला; चालक ठार, वाहकाचे दोन्ही पाय शरीरापासून वेगळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 18:14 IST2021-12-22T18:04:02+5:302021-12-22T18:14:06+5:30
टीनपत्रे घेऊन जात असलेला भरधाव ट्रक अचानक पुलाखाली कोसळला. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर दोन्ही पाय शरीरावेगळे झालेल्या अवस्थेत वाहक तडफडत होता.

भरधाव ट्रक पुलाखाली काेसळला; चालक ठार, वाहकाचे दोन्ही पाय शरीरापासून वेगळे
यवतमाळ : हिवरी येथील आर्णी मार्गावर बुधवारी सकाळी ६ वाजता नांदेडकडे टीनपत्रे घेवून जात असलेला ट्रक अचानक पुलाच्या खाली कोसळला. हा भीषण अपघात पाहून अनेकांच्या अंगावर शहारे उभे राहिले. ट्रकची कॅबिन पूर्णत: नाल्यात गाडल्या गेली. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर दोन्ही पाय शरीरावेगळे झालेल्या अवस्थेत वाहक तडफडत होता.
ज्ञानेश्वर तुकाराम कोपनर (२४) रा. हुलेवाडी, ता. लोही, जि. नांदेड असे मृत चालकाचे नाव आहे. तर उमेश विलास किडे (२०) रा. चिखल भोसी ता. कंधार जि. नांदेड असे जखमी वाहकाचे नाव आहे.
आज सकाळी एमएच२०-६८१४ क्रमांकाचा ट्रक नागपूरवरून नांदेडकडे टीनपत्रे घेवून जात होता. दरम्यान अचानक हा ट्रक वाघाडी पुलावरून खाली कोसळला. भल्या पहाटे हा अपघात झाल्याने घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. क्रेन आणल्याशिवाय त्यातील जखमी व मृताला बाहेर काढता आले नाही. अवधूतवाडी पोलीस घटनास्थळी उपस्थित होते.
जखमी उमेशचे दोन्ही पाय शरीरावेगळे झाले आहे. त्याला यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने तेथून नागपूर येथे हलविण्यात आले. काही तासांच्या शोधकार्यानंतर चालक ज्ञानेश्वरचा मृतदेह हाती लागला. वाहक उमेशचे दोन्ही पायसुद्धा तेव्हाच मिळाले.